सकाळी धावपळीच्या वेळी प्रत्येकजण सोयीस्कर प्रवास करण्यास प्राधान्य देत असतो. अशा वेळी अनेक लोक ओला, उबेर, खासगी टॅक्सी, रिक्षाने प्रवास करतात. परंतु याला पर्याय म्हणून बेस्ट उपक्रम लवकरच प्रवाशांना दिलासा देणार आहे. आता लवकरच तुम्ही खासगी वाहनांच्या धर्तीवर बेस्टमध्येही आपले आसन आरक्षित करू शकणार आहात. ही सुविधा तुम्हाला सध्याच्या ‘चलो अॅप’द्वारे मिळेल किंवा यासाठी स्वतंत्र अॅप असेल, असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
बेस्टमध्ये आसन आरक्षित
आता येणाऱ्या काही दिवसात प्रवाशांना बेस्ट बसमधील आसन आरक्षित करता येणार आहे. यासाठी सध्या कार्यरत असलेल्या चलो अॅपचा वापर केला जाईल अथवा स्वतंत्र अॅपद्वारे आसन आरक्षित करण्याची सुविधा दिली जाईल. त्यात प्रवाशांना बसचा मार्ग, वेळ, त्या मार्गावर आणखी किती बससेवा असतील, याची माहिती मिळू शकेल. या सेवांमध्ये फक्त वातानुकूलित बस (AC) चालवण्यात येतील. त्याचे नियोजन सुरू असून येत्या तीन महिन्यात ही सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यामुळे लवकरच तुम्हाला बेस्टमध्येही तुमचे आसन आरक्षित करता येणार आहे.
( हेही वाचा : रेल्वेच्या ‘या’ बोगीतून प्रवास कराल तर थेट तुरुंगात जाल! )
बेस्टच्या इतर सुविधा
या अॅपमुळे आता डेपोमध्ये लाईन लावून तिकीट काढण्याची आवश्यकता भासणार नाही. चलो सुपर सेव्हर योजना तुम्हाला तुमच्या बस प्रवासावर पैसे वाचविण्यास मदत करतात. सुपर सेव्हर योजना चलो कार्ड आणि चलो अॅपवर उपलब्ध आहेत. तुमच्या सोबत तुम्ही हे स्मार्ट कार्ड कायम बाळगू शकता. यात वेळोवेळी पैसे भरून रिचार्ज करणे गरजेचे आहे.
सुपर सेव्हर योजना
प्रवाशांनी दैनंदिन तिकीट किती रुपये असते त्या पर्यायाची निवड करावी, त्यानुसार सुपर सेव्हर प्लॅन उपलब्ध होतील
- ५ रुपये तिकीट – ५० फे-या (महिना) १९९ रुपये
- १० रुपये तिकीट- ५० फे-या (महिना) ३९९ रुपये
- १५ रुपये तिकीट- १०० फे-या (महिना) ७४९ रुपये
विद्यार्थी पास
- महिना पास – २०० रुपये
- त्रैमासिक पास – ६०० रुपये
स्पेशल पास
- रिपोर्टर/ पत्रकार – ३९५ रुपये
- दिव्यांग व्यक्ती – ३ वर्षे मोफत प्रवास
- शासकिय सेवानिवृत्त व्यक्ती- ९०० रुपये