राज्यात झिका व्हायरसचा दुसरा रुग्ण, तर अमरावतीत कॉलराची साथ

146

राज्यात कोरोनाची संख्या आटोक्यात येत असताना पालघर जिल्ह्यात झिका व्हायरसचा रुग्ण सापडला आहे. तर अमरावती जिल्ह्यात कॉलराची साथ पसरल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. बुधवारी कोरोनाच्या दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

( हेही वाचा : पावसात रेल्वेचा खोळंबा झाल्यास मिनिटात येईल अपडेट; रेल्वे प्रवाशांसाठी नवे अ‍ॅप!)

सात वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची बाधा

राज्यात गेल्यावर्षी झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. पुण्यात आढळलेल्या या रुग्णाला यशस्वी उपचारानंतर बरे करण्यात आले. आता पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झई गावातील आश्रम शाळेत शिकणाऱ्या सात वर्षांच्या मुलीच्या शरीरात झिका व्हायरस आढळला. पुण्यातील राष्ट्रीय विषाणूजन्य संस्थेच्या अहवालात मुलीला झिका व्हायरसची बाधा झाल्याचे समोर आले. याबाबत माहिती मिळताच स्थानिक प्रशासन चांगलेच कामाला लागले.

अमरावती जिल्ह्यातील अमरावती आणि चिखलदरा तालुक्यात कॉलराची 7 जुलैपासून साथ आली. दोन्ही जिल्ह्यात आतापर्यंत 181 जणांना कॉलराची लागण झाली आहे. पाचडोंगरी, कोयलारी, घाना तसेच नया अकोला येथे कॉलराचा उद्रेक झाला आहे. या उद्रेकात पाच जणांनी आपला जीव गमावला. त्यात दोन स्त्रिया आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. 24 ते 40 वयोगटातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला तर दोन रुग्णांचे वय सत्तरीपार होते.

वैद्यकीय पथके तैनात

अमरावती जिल्ह्यात उद्रेक झालेल्या गावांमध्ये प्रशासनाने वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. सावधानता म्हणून तपासणीच्या माध्यमातून रुग्णांचा शोध घेत त्वरित उपचार देण्यासाठी ही पथके नियुक्त करण्यात आली आहे. उद्रेक झालेल्या भागातील पाण्याची गुणवत्ता चाचणी केली जात असल्याचेही आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

10 कोरोनाबधितांचा मृत्यू

नवी मुंबई, पुणे, सातारा येथे प्रत्येकी दोन कोरोनाच्या रुग्णांनी उपचारादरम्यान आपला जीव गमावला. मुंबई, वसई-विरार, सोलापूर आणि अकोल्यातही प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आता राज्यात 16 हजार 922 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.