सध्या राज्यात कोरोनाची नवीन रुग्ण वाढत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून राज्य सरकारने गणेशोत्सवात काही निर्बंध लागू केले आहेत. आता त्यात आणखी भर पडत आहेत. पुण्यात शुक्रवारी, १० सप्टेंबर, गणेश चतुर्थीपासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
पुण्यात ७,५०० पोलिसांचा फौजफाटा
पुण्यात यंदा गणेशोत्सव काळात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत अर्थात १९ सप्टेंबरपर्यंत हे कलम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यात कुठेही दिवस-रात्र ५ पेक्षा अधिक संख्येने एकत्र येता येणार नाही. त्यामुळे साहजिकच गणेश आगमन असो कि विसर्जन असो मिरवणूक काढता येणार नाही. सामाजिक अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. पुणे शहर सह आयुक्त रवींद्र सिसवे यांनी हा आदेश काढला आहे. पुण्यात ७,५०० पोलिस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला जाणार आहे.
(हेही वाचा : ईडी कारवाईचा सपाटा! शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटून ठरवणार व्यूहरचना!)
मंडपाला मर्यादित संख्येने परवानगी!
दरम्यान पुण्यात एकूण ३,५४० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या आहे. यातील बहुतांश मंडळांचे गणेश मंदिरे आहेत. ती मंडळे यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा करणार आहेत, त्यांना मंडपासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. तर ज्या मंडळाची मंदिरे नाहीत, त्यांना मर्यादित स्वरूपाच्या मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान यंदा मंडपामध्ये येऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे गणेश मंडळांना आता ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यामुळेही होणारी गर्दी कमी होणार आहे.
Join Our WhatsApp Community