‘कोविड – १९’चा सामना करताना मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वस्तरीय कार्यवाहीची जगभरात नोंद घेतली गेली. या कामगिरीमध्ये मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलाचेही महत्त्वाचे योगदान होते. मुंबई महापालिकेने अल्पावधीत उभारलेली जंबो कोविड उपचार केंद्रे, महापालिकेची विविध रुग्णालये याठिकाणी महापालिकेच्या सुरक्षा दलाने अत्यंत समयसूचकतेने, संवेदनशीलतेने आणि सुयोग्य प्रकारे कोविड विषयक परिस्थिती हाताळली.
ही निश्चितच एक महत्वाची आणि कौतुकास्पद कामगिरी आहे, असे गौरवोद्गार मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी काढले. मंगळवारी मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलाच्या ५६व्या वर्धापन दिन कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
(हेही वाचाः हवामान बदलाचा बसणार ‘फटका’! मुंबईसह ‘या’ शहरांसाठी धोक्याची घंटा)
कर्मचाऱ्यांना अद्ययावत राहणे गरजेचे
मुंबई महापालिकेत कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदलत्या काळानुसार अद्ययावत राहणे गरजेचे असते. सुरक्षा दलाच्या या प्रशिक्षण केंद्राचे कालसुसंगत आधुनिकीकरण करणे गरजेचे असून, याविषयीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश काकाणी यांनी महापालिकेच्या सुरक्षा दलाला दिले.
रिक्त पदांबाबत कार्यवाही सुरू
त्याचबरोबर सुरक्षा दलातील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोविडमुळे निधन झाले, त्यांच्या वारसांना योग्य ती आर्थिक मदत देण्यासोबतच पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. सुरक्षा दलातील रिक्त पदांबाबत योग्य ती प्रशासकीय कार्यवाही देखील सुरू आहे, असेही काकाणी यांनी सांगितले.
( हेही वाचा : वरळी किल्ल्यावर झगमगाट, पण वांद्रे किल्ल्याकडे दुर्लक्ष का? )
आयुक्तांनी केले कौतुक
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलासोबतच मुंबई अग्निशमन दल व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग यांच्यात सातत्याने अधिक प्रभावी सुसमन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे असल्याचेही काकाणी यांनी सांगितले. तसेच वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अतिशय देखणा व शिस्तबद्ध असल्याचेही सांगत त्यांनी महापालिकेच्या सुरक्षा दलाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे, प्रमुख सुरक्षा अधिकारी (प्रभारी) विलास सुर्वे यांच्यासह महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यातील माजी अधिकारी व कर्मचारी आणि सध्या कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’, मुंबई पोलिस दल यांचे प्रतिनिधीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्वोत्कृष्ट प्लाटूनचा गौरव
कार्यक्रमादरम्यान सुरक्षा दलाच्या विविध ‘प्लाटून’द्वारे कवायती व शस्त्र कवायती सादर करण्यात आल्या. यामध्ये सर्वोत्कृष्ट प्लाटूनचा पुरस्कार ‘प्लाटून क्रमांक २’ यांना घोषित करण्यात आला. या ‘प्लाटून’ चे प्रमुख व विभागीय सुरक्षा अधिकारी समीर माने यांचा अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या हस्ते ‘विजेता चषक’ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तर लवकरच सेवानिवृत्त होणारे उपप्रमुख सुरक्षा अधिकारी दिनेश चव्हाण यांचाही प्रातिनिधिक सत्कार या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा दलातील अधिकारी संदीप वालावलकर व सुशील बडेकर यांनी केले.
Join Our WhatsApp Community