मुंबई व महानगरातील प्रदूषणाचा विळखा आता वातावरणातील वरच्या थरापर्यंत पोहोचला आहे. कोरोनानंतर महानगरातील बांधकामांना वेग आल्याने सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड या दोन्ही घातक प्रदूषकांची पातळी वातावरणातील तपांबर या वरच्या थरापर्यंत पोहोचल्याचे सॅटलाईट प्रतिमेच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. मुंबई, कल्याण-डोंबिवली, पालघर, वाडा तसेच डहाणूपर्यंत दोन्ही प्रदूषकांची पातळी वाढत असल्याचे चित्र लाल रंगातून दिसत असल्याने महानगर परिसरातील बांधकामामुळे हवेचा दर्जा खराब होत असल्याने डॉक्टरांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा दर्जा सातत्याने धोकादायक पातळीवर दिसून येत आहे. मुंबईत चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल तसेच नवी मुंबईत सातत्याने सूक्ष्म धूलिकणांचा दर्जा ३०० प्रति क्यूबीकमीटरच्याही पुढे गेला होता. जानेवारीत काही दिवस कांदिवली, सायन, विलेपार्ले येथील हवेचा दर्जा ३०० प्रति क्यूबीकमीटरपेक्षाही जास्त होता. मुंबईतील ब-याच भागांत हवेचा दर्जा २०० प्रति क्यूबीकमीटरपुढे जात असल्याची नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोंदवली जात आहे. या वर्गवारीतील हवा अतिखराब असल्याने आरोग्यासाठी घातकच ठरते.
नवी मुंबई विमानतळातील कामामुळे वाशी, सानपाडा, नेरुळ येथील रहिवासी संकुल भागांतही हवेची पातळी धोकादायक दिसून येत आहे. मीरा-भाईंदर आणि विरार येथेही वाढत्या बांधकामामुळे सलग चार ते पाच दिवस हवेचा दर्जा अतिखराब असल्याचे संकेत नोंदीतून मिळत आहेत.
( हेही वाचा: NCRTC Recruitment 2023: तरुणांनो NCRTC मध्ये नोकरीची संधी; ‘असा’ करा अर्ज )
मुंबईतील खराब हवेमुळे १३ जानेवारी रोजी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सफर तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांची बैठक बोलावली होती. हवेच्या प्रदूषणांची नोंद सर्व ठिकाणांहून मिळण्यासाठी सफर तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोघांचीही नोंद वापरली जावीस, असा सल्ला तज्ज्ञांनी बैठकीत दिल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community