पुढील शैक्षणिक सत्रापासून नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यास पूर्णपणे बदलला जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचा एनसीएफ तयार करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग चार टप्प्यात विभागले आहेत. आता इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत १५० विषयांची पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत.
नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर पद्धत
तसेच इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर पद्धत लागू करण्याचा निर्णय नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क- एनसीएफद्वारे (राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा) घेण्यात आला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता तिसरी ते बारावी इयत्तेपर्यंत १५० पर्यायी विषयांची पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना आपले विषय निवडायचे आहेत, तर वर्षातून दोनदा परीक्षा होणार आहे.
अशी असेल सेमिस्टर पद्धत
इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सेमिस्टर पद्धतीने दिले जाईल. वर्षभरात बोर्डाची परीक्षा देण्याच्या दोन संधी देण्यात येतील. इयत्ता नववी, दहावी, बारावीमध्ये सुमारे १६-१६ पेपर्स (कोर्स) द्यावे लागतील. याचा अर्थ एका वर्षात कमीत कमी आठ विषयांचे पेपर द्यावे लागतील. इयत्ता नववीचा निकाल हा दहावीच्या अंतिम निकालाशी जोडलेला असेल. तसेच अकरावीमध्ये मिळालेले गुण बारावीच्या निकालाशी जोडून त्यावर आधारित गुणपत्रिका मिळेल.
(हेही वाचा – महामंडळ वाटपासाठी नवा फॉर्म्युला निश्चित ; वाचा कोणाच्या वाट्याला किती महामंडळे?)
तीन समूहांतील चार विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील
नववी, दहावीसाठी आठ स्ट्रीममधील किमान तीन समूहांतील चार विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. प्रत्येक विषयाचे चार-चार पेपर असतील. विद्यार्थ्यांना १५० विषयांच्या पर्यायांतून आपले विषय निवडायचे आहेत. आतापर्यंत अकरावी व बारावीच्या स्तरावर विज्ञान, वाणिज्य, कला अशा शाखांतील विषय असतात. मात्र, आता नवीन पद्धतीनुसार संगीत, खेळ, क्राफ्ट व व्होकेशनल एज्युकेशन या विषयांना दर्जा गणित, विज्ञान, मानव्य शाखा विषय, भाषा, सामाजिक शास्त्र यांच्याइतकेच महत्त्व दिले जाणार आहे.
नवी पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत इयत्ता तिसरी, सहावी व नववीची नव्या पद्धतीची पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
तसेच इयत्ता नववी व दहावीमध्ये आठ स्ट्रीम असतील. त्यात मानव्य शाखा विषय, भाषा, गणित, व्होकेशनल एज्युकेशन, शारीरिक शिक्षण, कला, समाजशास्त्र, विज्ञान, आंतरशाखीय विषय अशा आठ गटांतील विषय असतील. त्या प्रत्येक गटातील दोन असे १६ विषय विद्यार्थ्यांना निवडावे लागतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community