स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सेनेकडून १० लाखाची मदत

स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

126

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरच!

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एमपीएससीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु होईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु, राज्य सरकार संवेदनशील आहे. स्वप्नील लोणकरच्या दुर्दैवी आत्महत्येची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेऊन एमपीएससीच्या 15 हजार 500 पदांची तातडीने भरती करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री शिंदे यांनी म्हटले.

(हेही वाचा : सामांन्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय का? पटोलेंचा फडणवीसांना सवाल!)

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सरकार न्याय देणार! 

गेल्याच आठवड्यात झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत याबाबतचा निर्णय जाहीर केला असून याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात देखील केली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मंत्री शिंदे यांनी म्हटले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता पावसाळी अधिवेशात याबाबत चर्चा झाली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.