Shirish Kanekar : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

170
Shirish Kanekar : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे आज (मंगळवार, २५ जुलै) निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

आपल्या खुमासदार शैलीतील लेखनाने त्यांनी (Shirish Kanekar) मराठी पत्रकारिता आणि साहित्य विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी कणेकर यांची ओळख होती. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील त्यांचे वृत्तपत्रांतील स्तंभ प्रसिद्ध आहेत. तर ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध आहेत.

सन १९६८ ते १९८९ या दरम्यान त्यांनी (Shirish Kanekar) इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकारिता केली. याशिवाय ते मुक्त पत्रकारिता, मराठीत स्तंभलेखनही करीत होते. पत्रकारितेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या कणेकर यांनी आपल्या लेखन शैलीच्या बळावर आपला खास असा वाचकवर्ग तयार केला होता. राजकारण, क्रीडा, सिनेमा, अशा विषयांवर त्यांनी केलेलं वृत्तपत्रांमधील स्तंभलेखन लोकप्रिय झाले होते.

(हेही वाचा – Mithi River : मिठी नदीतून किती गाळ काढला?; ‘एसआयटी’मार्फत चौकशी होणार)

कणेकर (Shirish Kanekar) यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी पुण्यात झाला. त्यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पेण हे होते. वडील मुंबईत रेल्वेमध्ये डॉक्टर असल्याने त्यांचे बालपण मुंबईतील भायखळा येथे गेले. पुढे मुंबई विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले होते. पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांतून काम केले आहे. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.

तसेच व्यक्तिचित्र, रहस्यकथा ललित लेखन असं चौफेर लेखन केले. त्यांची (Shirish Kanekar) अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

कणेकर यांनी लिहिलेली पुस्तके : इरसालकी, खटलं आणि खटला, गाये चला जा, गोतावळा, चापलूसकी, चापटपोळी, फटकेबाजी, लगाव बत्ती, सूरपारंब्या, चहाटळकी, साखरफुटाणे, रहस्यवल्ली, मखलाशी, मनमुराद, डॉलरच्या देशा, एकला बोलो रे, माझी फिल्लमबाजी, यादों की बारात, पुन्हा यादों की बारात, गोली मार भेजे मे, वेचक शिरीष कणेकर, कट्टा, मी माझं मला (आत्मचरित्र)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.