मुंबई महानगरपालिकेचे ‘सीरो सर्वेक्षण – ५’ झाले सुरू

या सर्वेक्षणात एकूण ८ हजार नमुने आलटून पालटून घेण्यात येणार असून त्यांची चाचणी शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात करण्यात येणार आहे.

कोविड-१९ संसर्गाचा माग शोधण्यासाठी सीरो सर्वेक्षण (रक्त नमुने संकलन करुन सर्वेक्षण) महत्त्वाचे ठरत आले आहे. हे लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत चार वेळा सीरो सर्वेक्षण पूर्ण केले असून आता पाचवे सीरो सर्वेक्षण गुरुवार, १२ ऑगस्ट २०२१ पासून हाती घेण्यात आले आहे. यामध्ये एकूण ८ हजार नमुने संकलित करुन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल.

आतापर्यंत चार वेळा सर्वेक्षण करण्यात आले!

कोविड-१९ संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मुंबई महानगरपालिकेकडून उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय वस्ती, झोपडपट्टी, सोसायटी आदी परिसरातील रहिवाशांमध्ये किती प्रमाणात प्रतिपिंड (अँटिबॉडीज) तयार झाल्या, हे तपासण्यासाठी सातत्याने सीरो सर्वेक्षण (रक्त नमुने संकलन करुन सर्वेक्षण) केले जाते. मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने, मुंबईत आतापर्यंत चार वेळा सर्वेक्षण करण्यात आले आहेत. पहिले व दुसरे सर्वेक्षण जुलै व ऑगस्ट २०२० मध्ये तीन प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले, तर तिसरे सर्वेक्षण मार्च २०२१ मध्ये आणि चौथे सर्वेक्षण लहान मुलांकरीता मे ते जून २०२१ या कालावधीमध्ये सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले.

(हेही वाचा : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती आहे शिक्षणसम्राट मंत्री? भातखळकरांनी जारी केली यादी…वाचा…)

८ हजार नमुने आलटून पालटून घेण्यात येणार

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविड लसीकरण मोहीमही सुरू असल्याने, नागरिकांमध्ये प्रतिपिंड (अँटीबॉडी) चे प्रमाण पाहणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागातील महानगरपालिका दवाखान्यांमार्फत पाचवे सीरो सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२१) रोजी करण्यात आला आहे. बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये निवडक वैद्यकीय व्यावसयिकांद्वारे (जनरल प्रॅक्टीशनर्स) त्यांच्या दवाखान्यात सर्वेक्षणाबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या सर्वेक्षणात एकूण ८ हजार नमुने आलटून पालटून घेण्यात येणार असून त्यांची चाचणी शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात करण्यात येणार आहे. आयडीएफसी आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here