नमामि चंद्रभागा उपक्रमांतर्गत चंद्रभागा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीकाठच्या ११८ गावांतील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांचे दूषित पाणी चंद्रभागेत मिसळणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत ७०९ गावांत पर्यावरण रक्षणासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
दूषित पाण्याचे व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रमुख नदींचे प्रदूषण रोखण्याचे आवाहन केले आहे. गंगा नदीत होणारे प्रदूषण बऱ्यापैकी राेखले गेले आहे. त्याच धर्तीवर पंढरपुरातील पवित्र समजल्या जाणाऱ्या चंद्रभागा नदीचे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नमामि चंद्रभागा उपक्रमांतर्गत चंद्रभागा नदी परिसरातील गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेबाहेरील नदीकाठच्या गावातही केंद्र सरकारच्या विविध योजनांची सांगड घालून दूषित पाण्याचे व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत. माझी वसुंधरा मोहीम जिल्ह्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या गावात सध्या राबवण्यात येत आहे. झाडांना या अभियानांतर्गत हेरिटेज दर्जा देण्यात येत आहे. वायू, जल, अग्नी, वनस्पतींचे जतन करून जिल्ह्यातील ७०९ गावात हा उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येत असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
(हेही वाचा नगरच्या शाळेत कोरोनाचा विस्फोट! ५१ मुलांना लागण…)
Join Our WhatsApp Community