जर कुणाचा मुलगा किंवा मुलीला शाळेत प्रवेश मिळत नसेल तर त्याचा पालक काय करेल? फार तर शाळेच्या विरोधात आंदोलन करेल. शाळेच्या विरोधात शिक्षण खात्याकडे तक्रार करील, त्याही पुढे जाऊन न्यायालयात याचिका दाखल करील, मात्र पुण्यात राहणारा शैलेंद्र शिंदे नावाच्या व्यक्तीने कहरच केला. त्याने थेट गृहखात्याला इमेल करून मंत्रालय उडवण्याची धमकी दिली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी शिंदे याला अटक केली असून मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
…आणि मंत्रालयात हल्लकल्लोळ माजला!
मुलाला शाळेत प्रवेश मिळत नाही म्हणून त्याने गृह विभागाला धमकीचा मेल केला होता. सोमवारी, ७ जून रोजी संध्याकाळी हा मेल आल्यानंतर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला, मात्र याठिकाणी कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आलेली नाही. खबरदारी म्हणून या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला.
(हेही वाचा : पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचे! विरोधकांनी केला हल्लाबोल)
लक्ष वेधून घेण्यासाठी केला खटाटोप!
शैलेश शिंदे यांचा मुलगा पुण्यातील वानवडी परिसरातील हॅचिंग्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन फी आणि इतर मुद्दयावर त्यांच्या मुलाला प्रवेश देत नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक, शिक्षणमंत्री यांना तब्बल १५० ई-मेल केले होते. मात्र त्यावर उत्तर न आल्याने त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी धमकीचा मेल केल्याचे शिंदे यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. शैलेश शिंदेंला पुणे पोलिसांनी अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
Join Our WhatsApp Community