राज्यातील शक्तिपीठ धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकास आणि पर्यटनाच्या दृष्टीने शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Expressway) कामाला प्रात्यक्षात सुरुवात होत आहे. हा महामार्ग नागपूर – गोव्यादरम्यान असला तरी पवनार (जि. वर्धा) येथून सुरू होऊन पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असा एकूण ७६० किलोमीटरचा असणार आहे. गोवा या महामार्गावरील २६ ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. यासह ४८ मोठे पूल, ३० बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग प्रस्तावित आहेत. या महामार्गाच्या माध्यमातून १२ हुन अधिक तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असे १२ जिल्हे महामार्ग जोडणार आहे. हा महामार्ग सहापदरी असणार आहे.
१२ जिल्ह्यांतील १२ हजार ५८९ इतक्या गट नंबरमधील २७ हजार ५०० एकरांतून हा महामार्ग (Shaktipeeth Expressway) जाणार आहे. या सुपर एक्स्प्रेस-वेसाठी लागणारी जमीन राज्य सरकार राष्ट्रीय महामार्ग रिअल इस्टेट कायद्यांतर्गत संपादित करणार आहे. महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार ८६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या महामार्गाचे भूमिपूजन २०२५ मध्ये होणार असून २०३० मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने १८ तास लागतात; मात्र शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Expressway) निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार आहे.
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे जोडणार
महामार्ग कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाईदेवी, नागपूर तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी अशी तीन शक्तिपीठे जोडणार आहे. हा मार्ग औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंग मंदिरांनाही जोडेल. पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, सांगलीतील औदुंबर, कोल्हापूरमधील नृसिंहवाडी, पट्टणकोडोली, सांगवडे, कणेरी, आदमापूर आदी तीर्थक्षेत्रांना जोडण्यात येणार आहे.
११ हजार हेक्टर जागेची गरज
समृद्धी महामार्ग ७०१ कि.मी. लांबीचा असून, यासाठी अंदाजे ९ हजार हेक्टर जागा संपादित करावी लागली होती. नागपूर-गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी अंदाजे ११ हजार हेक्टर जागा संपादित करावी लागण्याची शक्यता आहे. हे भूसंपादन एमएसआरडीसीसाठी मोठे आव्हान बनले आहे.
Join Our WhatsApp Community