- ऋजुता लुकतुके
अमेरिकेत जागतिक मंदीची भीती आजही कायम आहे. गेल्या आठवड्यात तिथले बाजार शेवटचे दोन दिवस मिळून ३ ते ४ टक्क्यांनी पडले होते. त्यातच इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाची भीतीही जगाला सतावतेय. याचा संयुक्त परिणाम म्हणून जगभरातील शेअर बाजारात (Share Market Mayhem) सोमवारी चौफेर विक्रीचा माहौल होता. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधूनही मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेतल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २.६६ टक्क्यांनी घसरून २४,०५५ वर बंद झाला. तर सेन्सेक्समध्येही २,२२२ अंशांची घसरण झाली आणि तो ७८,७५९ अंशांवर बंद झाला.
(हेही वाचा – मुंबईत Drunk and Drive च्या कारवाईत प्रचंड वाढ; हॉटस्पॉट आले समोर)
सरकारी कंपन्या, बँका, संरक्षण क्षेत्रातील कंपन्या आणि माहिती तंत्रज्जान क्षेत्रातील कंपन्या यांचं सर्वाधिक नुकसान झालं. बँक निफ्टीही त्यामुळे १,२३५ अंशांनी घसरला. धातू क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. धातू कंपन्याच्या समभागांबरोबरच त्यावर अवलंबून ऑटो शेअरमध्येही मोठी घसरण झाली. एकटा टाटा मोटर्स शेअर तब्बल साडे सात टक्क्यांनी कोसळून ८८ अंशांच्या घसरणीसह १,०१६ वर बंद झाला. तर ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागांमध्ये आणि औषध कंपन्यांमध्ये त्यातल्या त्यात उसळी दिसून आली. हिंदुस्थान युनिलिव्हरचा समभाग ३३ अंशांनी वधारून १,७१५ वर बंद झाला. संरक्षण क्षेत्रातील माझगाव शिपयार्ड बिल्डर्स कंपनी तसंच रेल विकास निगम या कंपन्यांच्या समभागात प्रत्येकी ८ टक्क्यांची घसरण झाली.
भारतीय रुपयालाही फटका बसला असून तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८३.७८ अशा नीच्चांकी स्तरावर बंद झाला आहे. जागतिक बाजारात संध्या मंदीची भीती जाणवत असली तरी भारतात तुलनेनं याचा कमी परिणाम जाणवेल असं जागतिक संशोधन संस्था जेफरीजने सोमवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. पण, तरीही भारतीय बाजारांवर नकारात्मक परिणाम झालाच. ‘भारतीय शेअर बाजारांत अडीच ते तीन टक्क्यांची घसरण झाली असली तरी ही मंदी नजीकच्या कालावधीसाठीच असेल. लवकरच यातून भारतीय शेअर बाजार (Share Market Mayhem) सावरेल आणि खालच्या स्तरावरून भारतीय समभागांमध्ये पुन्हा खरेदी पहायला मिळू शकेल,’ असं मार्स्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे मुख्य सल्लागार विष्णू कांत उपाध्याय यांनी म्हटलं आहे. २३ जुलै रोजी झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात २ ते ३ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. पण, आता शेअर बाजार त्या आधीच्या स्तरावर पुन्हा पोहोचलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community