महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायम घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाइनवर पाहणाऱ्यांना आम्ही लाइनवर आणण्याचे काम केले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांना थेट लाइनवर आल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी त्यांचे नाव न घेता केली. परभणीतील कृषी विद्यापीठात रविवारी झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.
ऑनलाइन कारभारावर भर देणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्र्यांमुळे विकासकामांना ब्रेक लागला होता, पण आम्ही त्यांना असा करंट दिला की, ते थेट ऑनलाइनवरून लाइनवरच आल्याची स्थिती आहे. आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर हे सरकार पडणार, अशा बतावण्या त्यांच्या माध्यमातून सातत्याने झाल्या;परंतु ते शक्य झाले नसल्याने आता मुख्यमंत्री बदलणार, असे वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून विरोधक करत आहेत. त्यामुळे भूलथापांना बळी न पडता नागरिकांनी विकासकामे करणाऱ्या या महायुतीच्या सरकारला पाठिंबा द्या, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले.
अजित पवारांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे आता महायुती सक्षम झाली;कारण सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार, असे बोलले जात असेल तरी तशी शक्यता आता नाहीच. त्याचा परिणाम आगामी काळातसुद्धा दिसून येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 8 लाख 74 हजार लाभार्थ्यांना 1 हजार 446 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह तालुक्यातील आमदार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.