किचनमध्ये नवऱ्याला गाडून तिथेच ती जेवण बनवायची! ६ वर्षांच्या मुलीने तोंड उघडले आणि…! 

भावाच्या ६ वर्षांच्या चिमुरडीला जवळ घेऊन त्याने सहजच विचारले 'बेटा पप्पा कहा है?' त्यावर 'मम्मी और वो दुसरे चाचू को पता होगा', असे चिमुरडीने सांगताच तो हादरला आणि थेट पोलिस  ठाण्यात गेला.

89

पतीची हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देऊन ती बिनधास्त झाली होती. आता आपल्या प्रेमाच्या वाटेत कोणीही येणार नाही, असे तिला वाटत होते, मात्र गुन्हा अधिक काळ लपून राहत नाही. भाऊ हरवल्याचे कळताच मोठा भाऊ हा गावाहून मुंबईत आला. आपला भाऊ अचानक गेला कुठे?, यावर तो विचार करत असतानाच भावाची ६ वर्षांची चिमुरडी ‘चाचा..चाचा..’ म्हणत त्याला बिलगली. त्याने तिला जवळ घेऊन सहजच विचारले ‘बेटा पप्पा कहा है?’, त्यावर ‘मम्मी और वो दुसरे चाचू को पता होगा’, असे चिमुरडीने उत्तर दिले. त्यावर तो उडालाच. ‘दुसरा चाचू कोण?’, असा विचार करत त्याने थेट पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर जे वास्तव समोर आले त्याने त्याची झोपच उडाली. ज्या स्वयंपाक घरात भावाची पत्नी वावरत होती, त्या किचनमध्ये तिने प्रियकराच्या मदतीने भावाला गाडल्याचे समजले.

स्वयंपाक घरात काही लाद्या नवीन दिसल्या आणि शाहिदा फसली!

दहिसर पूर्व, रावळपाडा झोपडपट्टीत भाड्याने राहणारा रहीस करामत अली शेख (२८) हा पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहत होता. एका कपड्याच्या दुकानात नोकरी करणारा रहीस हा २१ मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने २५ मे रोजी दहिसर पोलिस ठाण्यात दिली. चार दिवसांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने देणे, तसेच बेपत्ता असलेल्या रहीसच्या भावाने पोलिसांकडे शंका उपस्थित करणे, यामुळे पोलिसांना संशय येऊ आला. पोलिसांनी परिसरात माहिती काढण्यास सुरुवात केली. २१ मे रोजी मद्यरात्री रहीसच्या घरात काही तरी संशयित हालचाली सुरू होत्या, घराबाहेर बऱ्याच मातीच्या गोण्या पडलेल्या होत्या. सिमेंट, वाळू देखील होती, अशी माहिती शेजाऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. मंगळवारी दहिसर पोलिसांनी रहीसच्या घरात जाऊन शोधाशोध केली असता पोलिसांना स्वयंपाक घरातील काही लाद्या नवीन दिसून आल्या, त्याच्यावर नुकतेच बांधकाम झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी रहीस याची पत्नी शाहिदा हिच्याकडे चौकशी केली असता तिने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

(हेही वाचा : महापालिका मलबार हिलकडील झाडांचे आरोग्य तपासणार!)

एक लादी काढताच कुबट वास आला! 

पोलिसांनी तेथील एक लादी उकरून काढली असता आतून कुबट वास आल्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी कुदळ-फावड्याने सर्व नवीन लाद्या काढून आतील माती बाजूला केली असता त्यातून गोणी बाहेर काढण्यात आली. त्या गोणीत रहीसचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलिसांनी त्याच वेळी शाहिदाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले व तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. शाहिदा हिचे अमित विश्वकर्मा नावाच्या इसमासोबत मागील दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. अमित विश्वकर्मा हा वॉचमनची नोकरी करणारा आहे. या दोघांच्या प्रेमात पती रहीस हा अडथळा होऊ लागल्यामुळे हे दोघे त्याच्या हत्येची योजना गेल्या काही महिन्यांपासून आखत होते. दोन वेळा शाहिदाने पती रहीसला जेवणातून झोपेच्या गोळ्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गोळ्यांनी रहीसला काही झाले नाही, म्हणून अखेरीस त्याची हत्या करून मृतदेह घरातच पुरण्याचे दोघांनी ठरवले होते. या हत्येची तयारी त्यांनी दोन दिवसांपूर्वी सुरू केली होती. २१ मे रोजी रात्री त्यांना मुहूर्त मिळाला आणि रहीसची वायरने गळा आवळून हत्या केल्यानंतर या दोघांनी स्वयंपाक घरात ५ फूट खड्डा करून त्यात त्याचा मृतदेह गाडला व पुन्हा खड्डा बुजवून त्याच्यावर नवीन लाद्या लावून, आहे तसे करून ठेवले. हे सर्व करीत असताना दोन्ही मुले जागी होती. शाहिदाने मोठ्या आवाजात त्यांना टीव्ही लावून टीव्ही समोर बसवून आपले काम उरकून घेतले, अशी कबुली पत्नी शाहिदा हिने दिली. पोलिसांनी हत्या, पुरावा नष्ट करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून शाहिदा आणि तिचा प्रियकर अमित विश्वकर्मा या दोघांना अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.