विजयादशमीच्या पूर्वसंध्येला दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) उत्साहपूर्ण सोहळा संपन्न झाला. गिर्यारोहणासारख्या अत्यंत साहसी क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यासाठी ‘शिखर सावरकर पुरस्कार २०२४’चा (Shikhar Savarkar Puraskar) वितरण सोहळा ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. खंडेनवमीच्या निमित्ताने या वेळी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजनही करण्यात आले. हिमालयीन गिर्यारोहणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल (Chandraprabha Aitwal) यांना मानाचा ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर गिर्यारोहणाच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन करणाऱ्या आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या रायगड येथील सिस्केप या संस्थेला ‘उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था’ म्हणून गौरवण्यात आले. गिर्यारोहणात गगनचुंबी कातळभिंती आणि बेलाग सुळक्यांवर शास्त्रशुद्ध आणि कलात्मकरित्या आरोहण करणारा उदयोन्मुख इंद्रनील खुरंगळे (Indranil Khurangale) यांना ‘युवा साहस पुरस्कार’ देण्यात आला.
(हेही वाचा – SEESCAP संस्थेचा ‘शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था २०२४’ पुरस्काराने सन्मान)
या कार्यक्रमाला पद्मश्री के. सरस्वती, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर आणि पहिल्या शिखर सावरकर मोहिमेचे मोहीम नेता देवेंद्र गंद्रे हे मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रगीत आणि राज्यगीताने आरंभ झालेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कलांगणच्या विद्यार्थ्यांनी शौर्यगीत सादर केले. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फणसे आणि त्यांची मुले वीर आणि शर्वरी फणसे यांनी वीररसातील पोवाडा सादर केला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर पुरस्कारप्रदान सोहळा संपन्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. सुसंवादक कुणाल रेगे यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
‘या’ मान्यवरांना मिळाला आहे शिखर सावरकर पुरस्कार
राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः हिमालयीन विभागात अतुलनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ भारतीय दिग्गजांकरीता ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. याआधी कर्नल (निवृत्त) प्रेमचंद, पद्मश्री सोनम वांग्याल, ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच सह्याद्री विभागात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट साहसी गिर्यारोहकांकरीता एक वैयक्तिक आणि सह्याद्री विभागातच उत्कृष्ट साहसाबरोबरच इतर पूरक कामासाठी एक सांघिक अर्थात संस्थात्मक स्तरावर दिला जाणारा पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार दिले जातात.
अशी झाली पुरस्कारांची सुरुवात
२०१५ हे वर्ष स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र आत्मार्पणाचे ५०वे वर्ष होते. साहसाशी असलेला त्यांचा अनन्यसाधारण असा घनिष्ठ संबंध लक्षात घेऊनच सावरकर स्मारकाने तेव्हा एका राष्ट्राभिमानी हिमालयीन मोहिमेचे आयोजन केले होते. अशा भव्य आणि महत्त्वाकांक्षी मोहिमेकरीता ७ निष्णात गिर्यारोहकांची देशभरातून निवड करण्यात आली होती. तेव्हा अनेक अडचणींवर मात करत स्मारकाच्या या पथकाने २३ ऑगस्ट २०१५ या दिवशी हिमाचल प्रदेशात कर्चानाला परिसरातील एक अजिंक्य, अनामिक हिमशिखर सर केले होते आणि त्याद्वारे स्वातंत्र्यवीरांना ५०व्या आत्मार्पण वर्षानिमित्त एक अविस्मरणीय साहसी मानवंदना दिली. याच ऐतिहासिक मोहिमेत यशस्वीरीत्या सर झालेले त्या वेळचे अनाघ्रात, अनामिक हिमशिखर हे आज ‘शिखर सावरकर’ (Shikhar Savarkar Puraskar) म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर या शिखर सावरकर साहस पुरस्काराचे आयोजन केले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community