Shikhar Savarkar Purskar : गिर्यारोहण क्षेत्रातील मानाचे शिखर सावरकर पुरस्कार २०२३चे वितरण राज्यपालांच्या हस्ते होणार

228

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणारे गिर्यारोहण क्षेत्रासाठीच्या शिखर सावरकर पुरस्कार २०२३ (Shikhar Savarkar Purskar) चे वितरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी राजभवन येथे सायंकाळी ४.०० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर उपस्थित राहणार आहेत.

गिर्यारोहणात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणा-या हरिश कपाडिया यांना यावेळी मानाचा शिखर सावरकर जीवन गौरव साहस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर, गिर्यारोहणाच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन आणि सामाजिक कार्यास मोठ्या प्रमाणात हातभार लावणा-या मुंबईच्या दुर्गवीर या संस्थेची उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. गिर्यारोहणात विशेषतः सह्याद्री विभागात विशेष प्राविण्य दाखविणा-या उदयोन्मुख युवा गिर्यारोहक पुरस्कार यंदा मुंबईच्या मोहन हुले यांना देण्यात येणार आहे.

या पुरस्कार निवडीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या निवड समितीमध्ये आय. एम. एफ (पश्चिम विभाग) अध्यक्ष के. सरस्वती, एव्हरेस्टर १९९८ नरेंद्र केणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शीघ्र कृती दल राजू पाटील, शिखर सावरकर मोहीम प्रमुख देवेंद्र गंद्रे आणि मुंबई पोलीस आनंद शिंदे यांचा समावेश होता.

(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी विशेष कारागृहातून मुक्त होण्याला 100 वर्षे पूर्ण, ‘हॅलो सह्याद्री’ कार्यक्रमाद्वारे स्मृतींना उजाळा)

२०१५ हे वर्ष स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र आत्मार्पणाचे ५०वे वर्ष होते. साहसाशी असलेला त्यांचा अनन्यसाधारण असा घनिष्ठ संबंध लक्षात घेऊनच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तेव्हा एका राष्ट्राभिमानी हिमालयीन मोहिमेचे प्रथमच आयोजन केले होते. अशा भव्य आणि महत्वाकांक्षी मोहिमेकरीता ७ निष्णात गिर्यारोहकांची देशभरातून निवड करण्यात आली होती. अनेक अडचणींवर मात करत स्मारकाच्या या पथकाने २३ ऑगस्ट २०१५ या दिवशी हिमाचल प्रदेशात कर्चानाला परिसरातील एक अजिंक्य, अनामिक हिमशिखर यशस्वीरीत्या सर केले होते. त्याद्वारे स्वातंत्र्यवीरांना ५०व्या आत्मार्पण वर्षानिमित्त एक अविस्मरणीय साहसी मानवंदना दिली होती. याच ऐतिहासिक मोहिमेत यशस्वीरीत्या सर झालेले त्यावेळचे अनाघ्रात, अनामिक हिमशिखर हे सद्या “शिखर सावरकर” म्हणून ओळखले जाते. या यशस्वी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ४ वर्षांपासून शिखर सावरकर पुरस्काराचे (Shikhar Savarkar Purskar) आयोजन केले जात आहे. गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारातून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्था यांना त्यांनी अंगिकारलेल्या कार्याकरीता थोडीफार मदत म्हणून या पुरस्कारात स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि आकर्षक धनराशीचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.