Shiv Janmotsav: ‘स्वराज्य’ सप्ताहाचा लोगो आणि ‘स्वराज्य पताका’चे अनावरण

281
Shiv Janmotsav: 'स्वराज्य' सप्ताहाचा लोगो आणि 'स्वराज्य पताका'चे अनावरण
Shiv Janmotsav: 'स्वराज्य' सप्ताहाचा लोगो आणि 'स्वराज्य पताका'चे अनावरण

शिवजन्मोत्सव (Shiv Janmotsav) निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १२ ते १९ फेब्रुवारी रोजी ‘स्वराज्य सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी ‘स्वराज्य लोगो’ आणि ‘स्वराज्य पताका’चे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयाला कायदेशीर आणि संविधानिक शिक्कामोर्तब करत निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अधिकृत वाटचाल केली जाणार आहे, असेही खा. तटकरे म्हणाले.

(हेही वाचा – Director General of Police Rashmi Shukla: पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे नागरिकांना पत्र, जनतेला उद्देशून व्यक्त केले मनोगत )

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘स्वराज्य सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा शुभारंभ १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ व सर्व मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत.

शिवगायन आणि ऐतिहासिक पोवाड्यांचे आयोजन…
यानिमित्त शिवगायन व ऐतिहासिक पोवाडे याचे आयोजन करण्यात आले आहे. तिथूनच ‘स्वराज्य ज्योत’ व ‘स्वराज्य पताका’ घेऊन यात्रा निघणार आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रम झाल्यावर १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाला अभिवादन केले जाणार आहे. तिथून वाशी, ठाणे, कल्याण दुर्गाडी किल्ला मलंगगड करुन बदलापूर येथे मुक्काम केला जाणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी बदलापूर, मुरबाड, माळशेज घाट इथून जुन्नर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवनेरीहून वडूबुद्रुक, देहू आळंदी लाल महलमार्गे सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम केला जाणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी सिंहगड, पुरंदर, सातारा येथे मुक्काम होणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी सातारा, प्रतापगड, पोलादपूर येथे मुक्काम केला जाणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी पोलादपूर ते महाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चवदार तळ्यावरुन पाचाड येथे मॉ जिजाऊंची समाधीजवळ रायगड किल्ला येथे मुक्काम केला जाणार आहे आणि दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी किल्ले रायगडावर होळीच्या माळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश पुतळ्याजवळ समारोपाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे, अशी माहितीही तटकरे यांनी यावेळी दिली.

‘स्वराज्य सप्ताह’ महोत्सव
प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वराज्य सप्ताह’ महोत्सव साजरा केला जाणार असतानाच प्रत्येक ठिकाणच्या नियोजनात ‘रयतेचे मेळावे’ घेणार असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ‘रयतेचे राज्य’ ही संकल्पना राबवून ऐतिहासिक घडामोडींचे विवेचन केले जाणार आहे. ‘स्वराज्य ज्योत’ आणि ‘स्वराज्य पताका’ यासाठी प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.

शिवव्याख्यानाचे आयोजन…
१५ फेब्रुवारी रोजी रयतेचा मेळावा पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर घेतला जाणार असून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी रोजी साताऱ्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार मकरंद पाटील हे रयतेचा मेळावा आयोजित करणार आहेत. औरंगाबाद येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे रयतेचा मेळावा घेतील. तुळजापूर येथे क्रीडामंत्री संजय बनसोडे हे रयतेचा मेळावा घेणार आहेत. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा सिंदखेडराजा येथे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे मेळावे घेतील. नाशिक दिंडोरी येथे रामशेत किल्ला आहे तिथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत रयतेचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ‘बहुजनांचे राज्य, रयतेचे राज्य’ याच्या आधारावर शिवव्याख्यान आयोजित करणार आहोत. याशिवाय शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. ‘राजमाता जिजाऊंचा शिवबा’ या संकल्पनेवर आधारित रांगोळी प्रदर्शन व स्पर्धा, घराघरात छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंची प्रतिमा लावण्यात येणार आहे अशी कार्यक्रमाची संपूर्ण माहितीही तटकरे यांनी दिली.

अल्पसंख्याक सेलच्यावतीने ‘सबका राजा शिवाजी राजा’ या विषयावर व्याख्याने राज्यभर आयोजित करण्यात आली आहेत. किल्ले दर्शन हा उपक्रम विधीमंडळ सदस्य नागरीकांसाठी आयोजित करणार आहेत, असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. माजी मंत्री व कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांच असंख्य कार्यकर्ते १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे होणार आहे, अशी माहितीही तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.