घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो का? काय म्हणाल्या शिवसेनेच्या नगरसेविका

कचरापेट्यांच्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले जात आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी नवीन कंत्राट देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे प्रमाण ९५ टक्के असल्याचा दावा महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. असे असतानाच सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका आणि आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी घरचा आहेर दिला आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी नेमलेल्या दत्तक वस्तीच्या माध्यमातून कचरा उचलला जात नसून, नागरिकच आपल्या घरचा कचरा सार्वजनिक कचरापेट्यांच्या ठिकाणी नेऊन टाकतात. परिणामी कचरापेट्यांच्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले जात आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी नवीन कंत्राट देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अजूनही कचरापेट्यांचे वाटप नाही

मुंबई महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे घरोघरी जाऊन कचरा उचलला जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मुंबई महापालिकेने २०१५-१६ मध्ये कचऱ्याचे डबे वितरित केले होते. परंतु त्यानंतर प्रशासनाच्यावतीने कचऱ्याचे डबे देण्यात आले नसून, आजवर अजोय मेहता, प्रविणसिंह परदेशी आणि इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठवूनही कचरापेट्या दिल्या जात नसल्याची खंत त्यांनी मांडली.

(हेही वाचाः जुन्या इमारतींच्या धर्तीवर डोंगराळ भागातील भिंतीचेही सर्वेक्षण करण्याची मागणी)

स्वतंत्र कंत्राट देण्याची गरज

घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी दत्तक वस्ती योजना राबवली जात असली, तरी या योजनेंतर्गत नेमलेल्या संस्थांकडून घराघरांमधून कचरा उचलला जात नाही. यापूर्वी हैद्राबाद पॅटर्न, मॉनिंग मॉपिंगद्वारे मुंबईत कचरा उचलला जात होता. पण आता या दोन्ही योजना बंद करण्यात आल्या आहेत. परंतु दत्तक वस्ती योजना राबवली जाते, त्याअंतर्गतही लोकांच्या घरांमधून कचरा गोळा केला जात नाही. त्यामुळे यासाठी स्वतंत्र कंत्राट देण्याची गरज असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

खरा चेहरा समोर

२४० लिटर क्षमतेच्या, १० लिटर क्षमतेच्या कचरापेट्या आता देणे बंद केले आहे. परंतु या कचरापेट्या देण्याबाबत प्रशासन उदासिन आहे. त्यामुळे कचरा पेट्यांअभावी उघड्यावर कचरा फेकला जात असून, याबाबत महापालिका व स्थायी समितीची विशेष सभा बोलावण्याची मागणीही त्यांनी केली आहे. एका बाजूला सत्ताधारी पक्षाने २४ तासांमध्ये कचरा उचलला जाईल, असे आश्वासन दिले होते. तर प्रशासनासोबतच सत्ताधारी पक्षानेही घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे प्रमाण ९५ टक्के असल्याचा दावा केला होता. परंतु आता सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेने आपल्याच महापालिकेचा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

(हेही वाचाः मुंबई काँग्रेसने एकाच दगडात मारले दोन पक्षी!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here