-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न शिवसेना आणि भाजपा महायुतीकडून पाहिले जात असले तरी प्रत्यक्षात मुंबई महापालिका आपल्या हाती कायम राखण्यासाठी शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) सज्ज झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या खासदार आणि आमदारांच्या माजी नगरसेवकांसोबत आयुक्तांच्या कार्यालयातील उठबस वाढली आहे. एका बाजूला यापूर्वीचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना भेटी देत नव्हते, तिथे महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी हे सत्ताधारी पक्षाऐवजी विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना भेटी देत बैठका घेत असल्याने यामागे नक्की दडलेय काय असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांची दिंडोशीतील शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) आमदार सुनील प्रभू यांनी गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी भेट घेत या विधानसभेतील पायाभूत विकासासह मुलभूत नागरी सुविधा समस्या सोडवण्यासाठी चर्चा केली. यामध्ये अपुरा पाणीपुरवठा, मालाड जलाशय टेकडी ते कांदिवली लोखंडवाला १२० फुटी रस्ता, वाहतूक समस्या असे अनेक प्रश्न या बैठकीत त्यांनी घेतले. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी सुनील प्रभू हे महापालिका मुख्यालयात कचऱ्याच्या समस्यांबाबत उपायुक्त किरण दिघावकर यांना भेटून बैठक घेतली. या दोन्ही बैठकीत माजी उपमहापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, गणपत वारिसे उपस्थित होते. त्याआधी मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी जोगेश्वरी विधानसभेचे शिवसेना उबाठाचे आमदार बाळा नर यांनी विभागातील विविध नागरी समस्यांबाबत बैठक घेतली होती.
(हेही वाचा – Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : वीर सावरकरांच्या मराठीसाठीच्या योगदानाचा पंतप्रधानांनी संमेलनात केला गौरव)
त्याशिवाय मागील महिना भरात शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) नेते आणि माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन वेळा आयुक्तांची भेट घेऊन विभागातील तसेच इतर प्रश्नांबाबत चर्चा केली होती. याशिवाय दक्षिण मुंबईतील शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी मागील महिन्यांत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विभागातील विकासकामांचा आढावा व समस्या मांडल्या होत्या. या बैठकीला शिवसेना उबाठाचे आमदार अजय चौधरी आणि मनोज जामसूतकर यांच्यासह सचिन पडवळसह इतर माजी नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
एवढेच नाहीतर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी आपल्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांची भेट घेत त्यांच्या मागणीबाबत चर्चा केली. त्यामुळे महापालिका आयुक्तांचे विरोधकांसाठी कायमच खुली असल्याचे दिसून येत असून गगराणी हे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या गोटातील असल्याने नक्की विरोधकांना अधिक वेळ देण्यामागील आयुक्तांचा हेतू काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
(हेही वाचा – मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’ चा कट?; Sanjay Nirupam यांची सरकारकडे चौकशीची मागणी)
एका बाजूला शिवसेना उबाठाचे (Shiv Sena UBT) आमदार व खासदार हे विभागातील प्रश्नांबाबत माजी नगरसेवकांना सोबत घेत आयुक्तांसोबत बैठका घेत असतानाच सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि खासदार हे कोणत्याही माजी नगरसेवक सोबत न आणता एकेकटेच आयुक्तांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे उबाठाचे लोकप्रतिनिधी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार व खासदार हे आपल्याच पक्षातील माजी नगरसेवकांवर बाजूला सारत काम करत असल्याने शिवसेना आणि भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community