Shivaji Park : झाडांसह विजेच्या खांबांवरील एलईडीच्या रोषणाईचे बटन ‘स्वीच ऑफ’

100

मुंबई सुशोभिकरण अंतर्गत सौंदर्यीकरणाची विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली असून यामध्ये विविध ठिकाणी विद्युत रोषणाईचीही कामेही करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईच्या माध्यमातून मुंबईत झगमगाट करून मुंबईच्या सौंदर्यात भर पाडण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात झाडांसह विजेचे खांब आणि अन्य ठिकाणी केलेल्या या विद्युत रोषणाईमुळे पावसाळ्यात विजेचे झटके अर्थात शॉक लागण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपत्कालिन संकट ओढले जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता पावसाळ्यात अशा प्रकारे केलेली विद्युत रोषणाई बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने संबंधितांना दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील झगमगाट पावसाळ्यात कमी झाल्याचे दिसून येत असून यासाठी जो कोट्यवधी रुपये खर्च केला आहे तो या पावसात वाहून तर गेला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रस्ते, पूल, उड्डाणपूल, पदपथ, वाहतूक बेटं, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना आदींचा समावेश असणाऱ्या तसेच दीर्घकालीन गुणवत्तेची १७ निरनिराळ्या प्रकारातील सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत ६१७ कोटी रुपये खर्च झाले असून त्यातील रस्ते सुधारणा कामांसाठी १२० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे रस्ते कामांचा खर्च वगळता सुशोभिकरणावर सुमारे ५०० कोटी रुपयांचाच खर्च झाल्याचे महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले होते.

मुंबई सुशोभिकरण प्रकल्प अंतर्गत आजवर एकूण १,१९६ कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्या पैकी ९५१ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये शहर विभागातील २८९ तर उपनगरांमधील ६६२ कामांचा समावेश आहे. ही कामे विभाग कार्यालयांमार्फत करण्यात आली आहेत. यामध्ये विद्युत रोषणाईवर सुमारे १०० कोटींहून अधिक रुपये खर्च केला जात असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

(हेही वाचा CM Eknath Shinde : अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी; आमचे सरकार परफॉर्मन्स देणारे, फेसबुक लाईव्ह करणारे नव्हे)

यात जी २० शिखर परिषदेसाठ मुंबई शहर व उपनगरातील विविध महत्वाच्या आणि द्रुतगती मार्गिकेवरील झाडांवर सुशोभीकरणासाठी एलईडी लाईटींग करण्यासाठी ३१ कोटी रुपये आणि

विविध करांसह ३८ कोटी रुपये खर्च केले जात आहे. यासाठी मेसर्स एएससी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर जबाबदारी सोपवली आहे. या मुंबई सुशोभीकरण अंतर्गत चेंबूर येथील अमरमहल पुलाखाली लाईटींगद्वारे सुशोभिकरण करण्यासाठी तब्बल १.४० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. अशाप्रकारे मुंबईतील २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत अशाचप्रकारे विविध झाडे तसेच विजेचे खांब आणि इतर ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली. परंतु पावसाळ्यात झाडांवर लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे विजेचा शॉक लागण्याचे भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवल्यानंतर अशाप्रकारच्या दोन घटना घडल्याने महापालिका प्रशासनाने अशाप्रकारच्या विद्युत रोषणाई तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जी २० शिखर परिषदेसाठी लावलेली झाडांवरील रोषणाईत पावसाळ्यात शॉक लागण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेची उपाययोजना म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, पावसाळ्यानंतर या शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणाऱ्या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी ही विद्युत रोषणाई पहायला मिळेल. तसेच काही वॉर्डांनाही अशाप्रकारच्या सूचना करण्यात आल्यानंतर ए विभागातील काही झाडांसह विजेच्या खांबाला एलईडीची केलेली विद्युत रोषणाईची तात्पुरत्या स्वरुपात स्वीच ऑफ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.