-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज(शिवाजीपार्क) मैदानातील लाल माती काढण्यावरून महापालिका प्रशासनाकडून केवळ अहवालच बनवले जात असल्याने तसेच प्रत्यक्षात यावर कृती होत नसल्याने मनसे आता आक्रमक झाली आहे. आधीच वायू प्रदुषणात वाढ होत असतानाच शिवाजी पार्कमधील लाल माती हवेत उडून होत असलेल्या त्रासामुळे स्थानिक जनता आणि फिरण्यास येणारे नागरिक हे त्रस्त आहेत, परंतु महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने अखेर प्रशासनाला मनसेने शेवटचा निर्वाणीचा इशारा देत मैदानातील लाल माती त्वरीत काढा, नाही तर हीच माती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने काढून काढलेली सर्व माती ही महापालिका मुख्यालय इमारत आणि महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या कार्यालयासमोरे आणून टाकली जाईल,असे म्हटले आहे. (Shivaji Park)
(हेही वाचा- Palghar Earthquake : पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज(शिवाजीपार्क) मैदानातील लाल मातीच्या होत असलेल्या त्रासाबाबत मनसेचे माहीम दादर विधानसभेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी महापालिका प्रशासनाला दिले. स्थानिक रहिवाशांसोबत मनसेने याबाबतच निवेदन आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या नावे दिले असून आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनामध्ये मनसे असे म्हटले आहे की,. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क मैदानाची एक ऐतिहासिक ओळख आहे. पण या ऐतिहासिक मैदानाची ओळख टिकवण्याऐवजी स्थानिकांना त्रास कसा होईल याचाच विचार महापालिक प्रशासन आणि तत्कालिन महापालिकेतील सत्ताधारी पक्ष करत आले आहेत. आता काही वृत्तपत्रांनी अशा बातम्या दिल्या की शिवाजीपार्क मैदानातील सर्व लाल मातीचा थर काढला जाईल म्हणून. पण प्रत्यक्षात आपण आयआयटीच्या अभ्यास अहवालानंतर याबाबत निर्णय घेणार आहात. पण महापालिकेचे अधिकारी हे शिवाजीपार्कमधील जनतेची दिशाभूल अशा वृत्ताद्वारे करत आहेत. त्यामुळे अशाप्रकारची खोटी माहिती वृत्तपत्राला देणाऱ्या अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो,असे यात म्हटले आहे. (Shivaji Park)
लोकांच्या नाका तोंडात लाल माती
या मैदानावर यापूर्वी धुळीचा त्रास होत होता ही वस्तूस्थिती मान्य करत मनसेने हे मैदान हिरवेगार करण्याच्या नादात जी काही लाल माती टाकण्यात आलीय, त्यामुळे तर लोकांच्या नाका तोंडात ही माती हवेतून धुळीच्या स्वरुपात जाते. लोकांच्या घरादारांनी ही धुळ जात आहे. शिवाजीपार्क मधील प्रत्येक झाड आणि प्रत्येक इमारत ही लाल मातीने माखली गेली आहेत. हे जे काही २०० ते २५० ट्रक लाल माती आपण या मैदानावर टाकली आहे ना, त्या मातीचाच हा परिणाम असल्याचे म्हटले आहे. (Shivaji Park)
(हेही वाचा- Border – Gavaskar Trophy : १० वर्षांनंतर भारताने गमावली बोर्डर – गावसकर मालिका, भारतीय संघाचं प्रशस्तीपत्रक लाल)
करोडो पैसा मातीतच गेला
शिवाजीपार्क हरित करण्याच्या नावाखाली हे काम काढून ज्यांनी माती खायची त्यांनी खाल्ली, पण आज त्यांचा त्रास शिवाजीपार्कमधील प्रत्येक जनता भोगत आहे. आपण याठिकाणी तेव्हा जी काही स्वप्ने दाखवली होती, ती काही प्रत्यक्षात आलेली नाहीत. ३५ विहिरी बांधल्या, पण त्यातील पाणी मैदानावर कधी शिंपडले गेलेच नाही. त्यामुळे याच्या नावावर जो काही करोडो रुपयांचा खर्च केला गेला आहे, तो मातीतच गेला आहे. ना आम्हाला मैदानावर हिरवळ पाहायला मिळाली, ना आमची धुळीपासून सुटका झाली. असे किती दिवस आम्ही धुळीचा त्रास सहन करत बसायचे असा सवाल केला आहे. (Shivaji Park)
लाल मातीच्या धुळीमुळे वाढले श्वसनाचे आजार
या शिवाजीपार्कच्य कट्ट्यावर अनेक ज्येष्ठ नागरिक फिरण्यास येतात, बसतात. लोक याठिकाणी प्रभात फेरी तसेच संध्याकाळच्या वेळेत फिरण्यास येतात. त्यांना शुध्द हवा आणि शुध्द वातावरण तर नाहीच. मग त्यांनी काय ही लाल माती खायला यायची का? एका बाजुला मुंबईतील हवेतील प्रदुषण, धुलीकण वाढतच आहे. त्यासाठी आपण रस्ते पाण्याने धुत आहात. पण शिवाजी पार्ककरांना असा दिलासा कधी मिळणार? या लाल मातीमुळे शिवाजी पार्कमध्ये फिरण्यास येणाऱ्या ज्येष्ठांना तसेच इतरांमध्ये श्वसनासारखे आजार वाढू लागले आहेत, काहींना हे आजार उद्भवू लागले आहेत. मग मला सांगा, आपण या मोकळ्या मैदानाना शहराची फुफ्फुसे म्हणतो, तर ही जर ठिकाणे प्रदुषित असतील तर जनतेची फुफ्फुसे कशी चांगली राहतील,असाही सवाल केला आहे. (Shivaji Park)
(हेही वाचा- ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघ बाद, ‘या’ दोन संघांमध्ये अंतिम लढत)
येत्या १५ दिवसांमध्ये या मैदानावरील लाल माती काढा!
त्यामुळे हे आमचे शेवटचे निवेदन आहे, यापुढे शिवाजीपार्कमधील जनतेला लाल माती आणि त्यापासून उडणाऱ्या धुळीपासून कायमची सुटका हवी. पहिले म्हणजे जे तुम्ही २०० ते २५० ट्रक लाल माती टाकले आहेत, ती काढून टाकावी आणि पुर्वीची नैसर्गिक परिस्थिती ठेवावी. आणि हे सर्व पुढील १५ दिवसांमध्ये व्हायला हवे. जर येत्या १५ दिवसांमध्ये या मैदानावरील लाल माती न काढल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लाल माती काढेल आणि ही सर्व माती महापालिकेच्या मुख्यालयासमोर तसेच जी उत्तर विभाग कार्यालयासमोर आणून टाकेल. त्यामुळे हा इशारा समजा हवा तर. आम्हा शिवाजीपार्ककरांना आता न्याय हवा आहे. जर यामुळे कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा निर्माण झाल्यास याला सर्वस्वी महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागाचे सहायक आयुक्त जबाबदार असतील असाही इशारा दिला आहे. (Shivaji Park)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community