शिवाजी पार्कची रोषणाई मुख्यमंत्र्यांच्या आमदार निधीतून की महापालिका निधीतून?

प्रस्तावामध्ये आमदार निधी महापालिकेच्या तिजोरीत वळता झाला किंवा नाही याबाबतचा उल्लेखही करण्यात आलेला नाही.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) येथील सी.रामचंद्र चौकापासून वसंत देसाई चौकापर्यंत पदपथाची विद्युत रोषणाई करण्याचे काम मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्यावतीने केले जाणार आहे. महापालिकेच्या निधीतून हे काम केले जाणार असून, स्थायी समितीने हा प्रस्ताव बुधवारी झालेल्या बैठकीत संमत केला. हे काम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदार निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. प्रस्तावामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपला आमदार निधी वापरण्याचे पत्र दिले असले, तरी याबाबतचा कोणताही निधी प्राप्त होण्यापूर्वी महापालिकेने हे काम हाती घेतले आहे. तसेच प्रस्तावामध्ये आमदार निधी महापालिकेच्या तिजोरीत वळता झाला किंवा नाही याबाबतचा उल्लेखही करण्यात आलेला नसल्याने, हे काम आमदार निधीतून केले जाते की महापालिकेच्यावतीने, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रस्ताव मंजूर

शिवाजी पार्काच्या पदपथावर आकर्षक रोषणाईचे काम करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांचा आमदार निधी वापरण्याबाबतचे पत्र दिले आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या २५ मे २०२१ रोजी शिवाजी पार्क येथील भेटीदरम्यान पार्काच्या विद्युत रोषणाईचे काम प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनीही हे काम तातडीने करण्याच्या सूचना दिल्यानंतर याबाबतच्या कामाच्या निविदा मागवण्यात आल्या. यामध्ये मेसर्स फ्ल्युएड अँड पॉवर अॅटोमेशन एलएलपी लिमिटेड कंपनीची १ कोटी २१ लाख २४ हजार ४७० रुपयांच्या कामासाठी निवड झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या बैठकीत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला.

(हेही वाचाः गणेशोत्सवात मुंबईत लागू होणार जमावबंदी… मुंबई पोलिसांचे आदेश नक्की वाचा)

प्रस्तावात उल्लेख नाही

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमदार निधी देण्यासाठी पत्र दिल्याचे नमूद केले आहे. परंतु आमदार निधी महापालिकेकडे वळता केला आहे किंवा प्राप्त केला आहे किंबहुना हे काम आमदार निधीतून केले जात आहे, अशाप्रकारचा कोणताही उल्लेख या प्रस्तावामध्ये नाही. त्यामुळे मंजूर केलेला प्रस्ताव हा महापालिकेच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामासाठीच असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रशासनाचे स्पष्टीकरण

याबाबत जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता प्रस्तावातील काम हे आमदार निधीतूनच होत आहे. आमदार निधी प्राप्त झालेला आहे. प्रस्तावामध्ये तसे नमूद नसले तरी निधी मिळालेला आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु सहायक आयुक्तांना आमदार निधी महापालिकेकडे प्राप्त झाल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाला याबाबतची कागदपत्रेच सादर करता आलेली नाहीत.

(हेही वाचाः राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लूकआऊट सर्क्युलर… काय आहे प्रकरण?)

अशी असेल रोषणाई

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील सी.रामचंद्र चौकपासून वसंत देसाई चौकापर्यंत पदपथाच्या विद्युत रोषणाई अर्थात इल्युमिनिशन या कामाची योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये विविध रंगांचे व आकर्षक आकाश कंदिल, डेकोरेटीव्ह बोलार्ड, एलईडी लाईट्स, विविध रंगांचे फ्लड लाईट, गोबो प्रोजेक्शन लाईट, भूमिगत लाईट व मशाल लाईट लावण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here