शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) दिवशी मंत्री शिवनेरी गडावर येतात तेव्हा शिवभक्तांना प्रवेश बंदी केली जाते, त्यामुळे शिवभक्तांमध्ये असंतोष पसरतो. यंदा शिवभक्तांना याविषयी नाराज होण्याची वेळ येणार नाही. कारण यंदा मंत्री शिवनेरीवर आल्यावर शिवभक्तांना गडावर प्रवेश देण्यात येणार आहे.
शिवजन्मस्थळाच्या उत्तरेला अभिवादन सभेचा मंडप उभारण्यात आला आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. गडावरील शिवजन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम मराठा सेवा संघाच्या वतीने होणार असून, शासकीय मानवंदना, मर्दानी खेळ; तसेच शिवचरित्रावरील प्रबोधनात्मक पोवाड्याचे सादरीकरण शाहीर राजेंद्र सानप करणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गणेश महाबरे यांनी दिली.
शिवनेरीवर येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जुन्नर शहरात २८ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभक्तांची याच ठिकाणी आपली वाहने लावावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवरायांच्या (Shiv Jayanti) जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांना शिवनेरीवर एकेरी मार्गाने येता येईल. शिवभक्तांना शिवकुंज इमारतीसमोरील गेटमधून आत येता येईल. पुढे जुन्या सदरेला वळसा घालून शिवजन्मस्थळाला अभिवादन करता येईल. यानंतर प्रदक्षिणा मारून दुसऱ्या बाजूने बाहेर पडता येणार आहे.
Join Our WhatsApp Community