हर हर महादेव… जय भवानी, जय शिवराय… (Shivrajyabhishek) छत्रपती संभाजी महाराज की जय असा अखंड जयघोष… शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर… भंडारा आणि फुलांची उधळण… भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी… अशा चैतन्यमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण साजरा झाला. इतिहासात घडलेला हा सुवर्णक्षण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी शेकडो शिवभक्तांनी गडावर मोठया संख्येने हजेरी लावली.
विश्व हिंदू परिषद, पुणे श्री शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने झाला. यावेळी इतिहास चिकित्सा, दुर्ग चिकित्सा, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे, ऐतिहासिक ग्रंथ परिचय, शिवकालीन शस्त्रकला आदी बाबींचा समावेश असणारी, शिवशक ही स्मरणिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशित झाली.
(हेही वाचा – Dress code : अहमहनगर (अहिल्यानगर) येथील 16 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार)
अभिवादन सोहळ्याचे (Shivrajyabhishek) यंदाचे हे सहावे वर्ष होते. छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅली विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे आली. त्यानंतर सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हलगी पथक, केशव शंखनाद पथक आदी सहभागी झाले होते. यावेळी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन आणि वेदपठण करण्यात आले.
कार्यक्रमाला (Shivrajyabhishek) सरनोबत सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज आकाश कंक, अनमोल कंक, आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे मंत्री संजय मुरदाळे, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप, सचिव श्रीकांत चिल्लाळ, श्रीपाद रामदासी यांसह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील झाले. त्याच प्रमाणे, पर्यावरण संवर्धन ही बाब लक्षात घेऊन रॅली दरम्यान बीज गोळ्यांचे रोपण करण्यात आले.
हेही पहा –
किशोर चव्हाण म्हणाले, भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा. आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शु. त्रयोदशी नृपशालिवाहन शके १५९६ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगाचे मूक साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले होय. त्यामुळे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. सोहळ्याकरीता पाहणी करत असताना छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाची पडझड झालेली दिसली, त्यामुळे त्या स्थळाची दुरुस्ती किंवा पुर्नबांधणी करण्यात यावी, तसेच किल्ले सिंहगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचे पूर्णाकृती पुतळे बसवले जावेत, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
Join Our WhatsApp Community