शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक 

न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून नगरसेवक किरण लांडगे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला. याप्रकरणात कुठल्याही क्षणी विनोबा भावे नगर पोलीसांकडून नगरसेवक किरण लांडगे यांना अटक होऊ शकते असे बोलले जात आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या जलविभागातील अभियंत्याला मारहाण करून एका मंदिरात कोंडून ठेवल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगे विरुद्ध दाखल झालेल्या गुन्हयात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्चन्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने गुरुवारी  फेटाळून लावत अटकपूर्व जामीन रद्द केला आहे. किरण लांडगे यांना कुठल्याही क्षणी पोलीसाकडून अटक होण्याची शक्यता आहे.
किरण लांडगे हे घाटकोपर पश्चिम बर्वे नगर,असल्फा व्हिलेज या ठिकाणी राहणारे आहे. चांदीवली वॉर्ड क्रमांक १६० मधून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. कुर्ला एल विभागातील पाणी खात्याचे अभियंते नितीन कुलकर्णी यांना कुर्ला पश्चिम अवधनगरी, बद्रीनाथ सोसायटी या ठिकाणी ८ सप्टेंबर रोजी फोनवर धमकी देऊन नगरसेवक किरण लांडगे यांनी बोलावून घेऊन त्यांना मारहाण करून एका मंदिरात डांबून ठेवले होते अशी तक्रार या अभियंत्याने विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात केली होती.
या तक्रारीवरून विनोबा भावे नगर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करुन डांबून ठेवणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार ८ सप्टेंबर रोजी झाला घडला होता. याप्रकरणातील अटक टाळण्यासाठी नगरसेवक यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
मात्र न्यायालयात सरकारी वकीलातर्फे या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास प्राथमिक पदावर असून गुन्हयातील फिर्यादी हे संशयित आरोपीच्या दहशतीखाली असून त्यांना भीती आहे, त्यांना जामीन देण्यात येऊ नये अशी मागणी सरकारी वकिलामार्फत करण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून नगरसेवक किरण लांडगे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला. याप्रकरणात कुठल्याही क्षणी विनोबा भावे नगर पोलीसांकडून नगरसेवक किरण लांडगे यांना अटक होऊ शकते असे बोलले जात आहे.

त्यामुळे लांडगेच्या विरोधात गुन्हा दाखल
नारायण नगर, अशोक नगर आणि मुकुंदराव आंबेडकर माग्र आदी भागांमध्ये मागील चार महिन्यांपासून पाण्याची समस्या असून यामुळे नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेवकाविरोधात रोष निर्माण झाल्याने नगरसेवक किरण लांडगे यांनी महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्याची भेट या भागांमध्ये लावली. यावेळी स्थानिक संतप्त रहिवाशांनी जलअभियंता विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांना शिविगाळ करत धक्काबुक्की केली. हा प्रकार घडत असताना नगरसेवक किरण लांडगेही तिथे उपस्थित होते. त्यामुळे लांडगे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता,असे बोलले जात आहे. दरम्यान, आपण वरच्या नायालयात धाव घेणार असल्याचे किरण लांडगे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here