शिवसेनेत दुफळी पडली, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले. यामागील मुख्य कारण भाजपला अंतर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला समर्थन,असे धोरण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले होते. हिंदुत्वाच्या विचारांच्या भाजपची घट्ट मैत्री तोडून उद्धव ठाकरे यांनी पुरोगामी विचारांच्या दोन्ही काँग्रेससोबत संघ जोडल्यामुळे शिंदे गट वेगळा झाला. मागील अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाने पक्षात इतका हल्लकल्लोळ माजला की, आज शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले, तसेच नावही वापरण्यास प्रतिबंध केला गेला आहे. आता उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाची विचारधारा पुरोगामी विचारांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मांडत आहेत. हा शिवसेनेचा हिंदुत्वापासून पुरोगामीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे, याचे द्योतक आहे.
अंधारे मांडतात हिंदुत्वाच्या विरोधात विचार!
शिवसेनेच्या इतिहासात अशाच पुरोगामी विचारातून डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेत आल्या होत्या, त्यानंतर त्या हिंदुत्ववादी बनल्या, पण या उलट आज सुषमा अंधारे यांच्याबाबत चित्र दिसत आहे. त्यांच्या प्रवेशानंतर सुषमा अंधारे उलट अधिक त्वेषाने पुरोगामी विचार मांडू लागल्या आहेत. यासाठी शिवसेनेने सुषमा अंधारे यांची राज्यभर महाप्रबोधिनी यात्रा सुरू केली आहे. मागील ५६ वर्षे ज्या शिवसेनेचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पाया रचला, तेच हिंदुत्व कसे वाईट आहे, असे सुषमा अंधारे आज उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या महाप्रबोधिनी यात्रेच्या व्यासपीठावरून मांडत आहेत. याहून दुसरे दुर्दैव नाही. जे छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेसाठी श्रद्धास्थानी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शिवसेनेच्या प्रत्येक सभांमध्ये ‘गोब्राह्मणप्रतिपालक…’ अशी घोषणा करत केला जातो, आज तीच घोषणा चुकीची आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभे आयुष्य शिवसेनेच्या व्यासपीठावरून मुसलमानांचा तिरस्कार केला, धर्मांध मुसलमान ही हिरवी विंचवांची पिलावळ आहे. ती आधीच ठेचून टाका, असे सांगायचे, आज सुषमा अंधारे शिवसैनिकांना शिवसेनेचे हिंदुत्व हे भेदभाव करत नाही, टुकडे टुकडे करत नाही, शिवसेनेसाठी सगळी मानवजात एक आहे, असे सांगत आहेत. या सुषमा अंधारे शिवसेनेच्या व्यासपीठावर रामदास स्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काही संबंध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली. तुकाराम महाराज हे शिवरायांचे गुरु होते, असेही म्हणाल्या.
(हेही वाचा दहशतवादी संघटनांना पोसणारा ‘हलाल’!)
कोण आहेत सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र २००६ मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. २००९ ते २०१० या काळात मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. त्या लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही होत्या. भारतभर फुले-शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत होत्या. २००९ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या. २८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, आणि पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.
Join Our WhatsApp Community