सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी वर्षभरापासून नवनवीन मुहूर्त सापडत आहेत. श्रेय लाटण्यासाठी राजकीय पक्षांची यासाठी चढाओढ सुरु आहे. आता शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळावरून ७ ऑक्टोबर रोजी विमान उडणार आहे, अशी घोषणा केली. मात्र चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी हा चौथा मुहूर्त मिळाला आहे, त्यामुळे या मुहूर्तावर तरी चिपी विमानतळावरून विमान उडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उड्डाण!
शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी ७ ऑक्टोबर हा नवरात्रोत्सोवाचा पहिला दिवस आहे. त्या दिवशीपासून आम्ही हवाई वाहतूक सुरू करायला सज्ज आहोत, अशा पद्धतीचे लेखी पत्र विमान वाहतूक करणाऱ्या विभागाने दिले असल्याचे सांगितले. त्यामुळे आता विमानतळ शंभर टक्के सुरू करायला हरकत नाही. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विमानतळ सुरू करण्याचे ठरले होते, पण नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे. त्या दिवसापासून विमान प्रवास सुरू होणार आहे, असेही खासदार राऊत म्हणाले. चिपी विमानतळ सुरू करण्यास अखेर डीजीसीआयची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अवघ्या २,५०० रुपयात होणार आहे. कार्यवाही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच मी पुन्हा एकदा दिल्लीला गेलो होतो. आम्ही हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांना चिपी विमानतळाचे काम पूर्णपणे झालेले आहे. लायसन्स मिळालेले आहे, असे सांगितल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
विमानतळाच्या उद्घाटनाचे ‘असे’ मुहूर्त टळले!
- २३ जानेवारी २०२१ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार अशी आय.आर.बी. कंपनीने माहिती दिली होती. मात्र त्या दिवशी उद्घाटन झाले नाही.
- प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी उद्घाटन होणार, अशी चर्चा सुरु झाली, किंबहुना आयआरबीच्या नावाने निमंत्रणपत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र नंतर ही निमंत्रणपत्रिका खोटी असल्याचे समोर आले.
- आयआरबी कंपनीने उद्घाटनाचा कार्यक्रम १ मार्च २०२१ रोजी आयोजित केला आहे, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. चिपी विमानतळावरून गणेशचतुर्थीपूर्वी विमान प्रवास सुरु होणार आहे. काही महिन्यांपूर्वी डीजीसीए आणि एअरपोर्ट अथॉरिटीने ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्याचे तंतोतंत पालन करुन आता एअरपोर्ट वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे, असे सांगितले होते, मात्र हा मुहूर्त देखील टाळला होता.