मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले असले, तरी शिवसेनेचे निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायचे, हे ठरले आहे. शिवसेनेत यापुढे सरसकट कुणालाही उमेदवारी द्यायची नाही, तर उमेदवारी देताना त्याचे वयही पाहिले जावे, अशा प्रकारचा विचार सुरु आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेत ४५ ते ५० च्या पुढील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यापूर्वी दोन ते तीन वेळा किंवा चार वेळा निवडून आलो आहोत, अशा प्रकारची टिमकी कितीही वाजवली गेली, तरी त्यांचे वय हे ग्राह्य धरून उमेदवारी दिली जाणार असल्याची कुजबूज शिवसेनेतच ऐकायला मिळत आहे.
महापालिका निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरेंवरच!
मुंबई महापालिकेच्या संभाव्य फेब्रुवारी २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्याने ही निवडणूक कधी होणार, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतोय याकडेही सर्वांचे लक्ष आहे. मात्र, ही सार्वत्रिक निवडणूक शिवसेनेचे युवा नेते व पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढली जाणार आहे. या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असून आदित्य ठाकरेंवरच महापालिकेची जबाबदारी सोपवण्यात आल्याने ते आपल्या मंत्रीपदाचा वापर मुंबईतील विकासकामे आणि त्यातून आपली प्रतिमा जनमानसांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
आदित्य ठाकरेंचा निर्धार
शिवसेनेत सध्या शिवसैनिक आणि युवा सैनिक अशी जुनी आणि नवीन कार्यकर्त्यांची फळी आहे. परंतु कोविडच्या काळामध्ये वय वर्षे ५० च्या पुढील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बाहेर फिरता आले नाही. त्यामुळे कोविडसारख्या संसर्गजन्य आजार पसरल्यास आपल्या नगरसेवकांना विभागून काम करता यावे याकरता यापुढे ४५ ते ५० च्या पुढील पदाधिकारी व विद्यमान तसेच माजी नगरसेवकांचा विचार केला जावू नये अशा प्रकारचा निर्धारच युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे वय वर्षे ४५ च्या आतील कार्यकर्ता, तसेच पदाधिकारी किंवा विद्यमान नगरसेवकाला उमेदवारी दिल्यास योग्य ठरेल, अशा प्रकारचा एक प्रकारचा विचारच सुरु आहे. त्यामुळे ज्यांची वयाची ४५ ते ५० वर्षे उलटली आहे, त्यांनी उमेदवारी मिळवण्याचा किंबहुना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळवण्याचा हट्टही करू नये अशा प्रकारचे संकेतही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : ‘बीडीडी’वासियांची लवकरच होणार स्वप्नपूर्ती… )
पन्नाशी उलटलेल्यांना कोणतेच स्थान राहणार नाही
आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यास राष्ट्रवादीला सोडून ज्या जागा उरतील, त्यातील निम्यापेक्षा अधिक जागा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना तर ५० टक्के जागांवर शिवसेना आणि कामगार संघटनांशी संबंधितांना उमेदवारी देण्याचाही विचार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे समवयस्क असणारे आणि धावपळ करणाऱ्या उमेदवारांची गरज आहे. आज महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक हे ४५ ते ५० वयाच्या आतील आहेत. ज्यामुळे ते आता दुसऱ्यांदा निवडून येतील, तेव्हा ते अधिक परिपक्व झालेले असतील. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनीही हाच फॉर्म्युला वापरुन ४५ ते ५० वयोगटातील उमेदवारांना संधी देण्याचा विचार आहे, जेणेकरून ते आदित्य ठाकरे यांच्या विचारांशी ते जुळवून घेऊ शकतात. तसेच आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक नवीन फळी यामाध्यमातून बांधली जावू शकते. त्यामुळे पुढील पाच वर्षांनी आदित्य ठाकरेंना अभिप्रेत अशाप्रकारची फळी निर्माण झालेली असेल. यामध्ये केवळ इतर पक्षातून शिवसेनेत आलेल्या आणि जिंकून येण्याची पूर्ण क्षमता आहे,अशा उमेदवाराला वयाचा निकष लावला जाणार नाही. तसेच विरोधी पक्षाचे वर्चस्व असलेल्या परंतु तिथे पक्षाच्या चिन्हाचा परिणाम न होता ती व्यक्ती म्हणून निवडून येते अशाप्रकरणांमध्येच केवळ अनुभवी म्हणून विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे शिवसेनेत आता वयाची पन्नाशी उलटलेल्यांना कोणतेच स्थान राहणार नसून त्यांना आता संघटनांत्मक बांधणीचीची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community