छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगभरात पोहोचवणा-या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘सावरकरः विस्मृतीचे पडसाद’ या विक्रम संपत लिखीत ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. या ग्रंथाचे मूळ इंग्रजी नाव ‘सावरकर: इकोस फ्रॉम ए फॉरगॉटन पास्ट’, असे आहे. याचा मराठी अनुवाद स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले आहे.
बाबासाहेबांच्या हस्ते अनावरण
‘जयदेव जयदेव शिवराया…’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आरतीची रचना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली आहे. शिवाजी महाराज हे स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी पूजनीय होते. सशस्त्र क्रांतिकारकांचे मुकूटमणी म्हणून ओळखल्या जाणा-या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील ग्रंथाचे अनावरण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसारख्या तपस्वी शिवचरित्रकाराकडून होणे, ही उल्लेखनीय बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी आदर्श होते, तर घराघरांत शिवाजी महाराजांची कीर्ती पोहोचवण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आहे.
सावरकरः विस्मृतीचे पडसाद या ग्रंथातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बालपणापासून ते रत्नागिरीतील स्थनबद्धतेपर्यंतचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे.
शिवशाहीरांनी सांगितली स्वातंत्र्यवीरांची आठवण
पुस्तकाचे अनावरण करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणींना उजाळा दिला. एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर केसरी वाड्यात आले होते. त्यावेळी 12-13 वर्षांच्या बाबासाहेबांनी सावरकरांना त्यांच्या भाषणांची हुबेहूब नक्कल करुन दाखवली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर आयुष्यभर फक्त नक्कलच करत राहणार का? स्वतःचं काहीतरी निर्माण कर, असे सावरकरांनी बाबासाहेबांना सांगितले. त्यांच्या या शब्दांनी बाबासाहेबांना प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच पुढे शिवचरित्राचा जन्म झाला असे बाबासाहेब पुरंदरेंनी आठवण सांगतांना सांगितले.
Join Our WhatsApp Community