धक्कादायक! दररोज ३१ मुले संपवतात जीवनयात्रा!

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ११ हजार ३९६ मुलांनी आत्महत्या केल्या.

134

सध्या समाजातील सर्व वयोगटातील घटकांसाठी त्यांचे जीवन संघर्षमय बनत चालले आहे. समाधानाची सीमारेषा उरली नसल्याने तसेच जीवनात सकारात्मकतेचा प्रभाव कमी झाल्यामुळे त्याचे रूपांतर नैराश्येत होत आहे. त्यातून मग आत्महत्येचे विचार वाढू लागले आहेत. विशेष म्हणजे हे प्रमाण विद्यार्थी दशेतील मुलांमध्ये वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

वर्षभरात ११ हजार ३९६ मुलांच्या आत्महत्या!

मागील वर्षभराचा काळ हा कोरोना महामारीचा होता. त्यानिमित्ताने लॉकडाऊन, सर्व व्यवहार बंद, शाळा-महाविद्यालये बंद, बेकारी अशा विचित्र परिस्थितीतून सारे जग जात होते. त्यात विद्यार्थ्यांचीही घुसमट होत होती. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाला. नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या मुलांनी अखेर त्यांची जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे २०२० या मागील वर्षभराच्या कालावधीत तब्बल ११ हजार ३९६ मुलांनी त्यांचे जीवन संपवले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) यांच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

(हेही वाचा : युवा सेना पुढे-पुढे, शिवसेना मात्र मागे…)

काय म्हणतो हा अहवाल?

मागील काही वर्षांत मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ११ हजार ३९६ मुलांनी आत्महत्या केल्या, जे २०१९ च्या तुलनेत १८ टक्के आणि २०१८ च्या तुलनेत २१ टक्के जास्त आहे. २०१९ मध्ये देशात ९ हजार ६१३ आणि २०१८ मध्ये ९,४१३ मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. २०२० च्या आत्महत्यांमध्ये ५ हजार ३९२ मुले आणि ६ हजार ४ मुली होत्या. म्हणजेच गेल्या वर्षी दररोज ३१ मुलांनी, प्रत्येक तासाला एक अशी आत्महत्या झाली होती. या सर्व आत्महत्यांच्या कारणांचे वर्गीकरण केले असता ४ हजार ६ आत्महत्या या केवळ कौटुंबिक समस्यांमुळे झाल्याचे दिसून येते. १ हजार ३३७ आत्महत्या प्रेमप्रकरणातून तर १ हजार ३२७ आत्महत्या ह्या आजारपणातून झालेल्या आहेत. या सर्व आत्महत्या ह्या १८ वर्षांखालील मुलांनी केलेल्या आहेत.

नेमकी काय होती आत्महत्येसाठी कारणे?

कोरोना महामारी आणि शाळा बंद झाल्यामुळे मुलांमध्ये मानसिक आरोग्याचा प्रश्न वाढला. हे समाजव्यवस्थेचे अपयश होते. मुलांमध्ये सकारात्मकता वाढेल, अशी व्यवस्था देण्याची जबाबदारी पालक, कुटुंब, शेजारी आणि सरकार या सर्वांची होती. जिथे मुले त्यांच्यातील क्षमता ओळखू शकले असते आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास तयार झाली असती, असे ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेचे उपसंचालक प्रभात कुमार म्हणाले. कोरोनाकाळात शाळा बंद, घराला कुलूप, मित्र किंवा शिक्षकांशी संवाद बंद, बाहेर नकारात्मक वातावरण या सर्व कारणांमुळे मुलांमध्ये तणाव वाढला. त्यांच्यापैकी अनेकांना घरातील तणावपूर्ण वातावरण, त्यांच्या प्रियजनांचा मृत्यू, संसर्गाची भीती आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अनेक मुलांवर शिक्षणातील अस्थिर वातावरणाचा ताण आला. अनेकजण सोशल मीडियाला बळी पडले. काही जण तासन तास गेम खेळू लागले. या सगळ्याचा मुलांच्या मनावर परिणाम झाला, असे विश्लेषण तज्ज्ञ करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.