मुंबईतील आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यास सुरुवात केल्यानंतर या सर्वांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सपैकी सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा अर्थात डोस घेतला नसल्याची बाब समोर आली आहे. जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही आजही या प्रवर्गातील सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस न घेतल्याने प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार असल्याचे स्पष्ट होत आहे.
लसीकरण मोहिम अद्याप अपूर्ण
१६ जानेवारीपासून देशभरात कोविडच्या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर मुंबईतील कुपर रुग्णालयातून या लसीकरणाच्या मोहिमेला प्रारंभ झाला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण करण्यास सुरूवात झाली. लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या १५ दिवसांमध्येच ७५ हजार ७५१ आणि दुसऱ्या टप्प्यातील फ्रंट लाईन वर्कर्सपैकी ३ हजार ३६३ लोकांचे लसीकरण पार पडले होते. त्यामुळे जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणामध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मोहिम फत्ते व्हायला हवी होती. परंतु ही मोहिमच अद्याप पूर्ण झालेली नाही.
(हेही वाचा आफ्रिकन देशांमधून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरु)
ही आहे आकडेवारी
मुंबईतील २७ नोव्हेंबर २०२१च्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सचे एकूण ७ लाख ५६ हजार ५३९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पार पडले आहे. यामध्ये ४ लाख २५ हजार ४६४ कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ३ लाख ३१ हजार ०७५ कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आरोग्य विभागातील कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स पैकी केवळ ३ लाख ३१ हजार ०७५ कर्मचाऱ्यांनी दोन्ही मात्रा घेतल्याने ते लसवंत झाले आहेत. परंतु अद्यापही ९४ हजार कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही. त्यामुळे जिथे सर्वसामान्य माणसांना लसीकरणाची सक्ती केली जात आहे, तिथे आरोग्य विभागातील कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सनी दुसरी मात्रा न घेतल्याने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची मोहिमच अर्धवट राहिली आहे.
दुस-या लसीची नोंदणी झालेली नाही
मात्र, लसीकरणाच्या नोंदणीच्या तांत्रिक बाबींमुळे दुसरी लस घेऊनही ती घेतली नसल्याचे दिसून येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या काळात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची नोंदणी ही त्यांच्या ओळखपत्रानुसार करण्यात आली होती, त्यानंतर ही नोंदणी आधार कार्डनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेऊनही तिथे पहिली मात्रा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अजून युनिव्हर्सल पास उपलब्ध होऊ शकला नाही. कस्तुरबासहित अनेक रुग्णालयांमध्ये ही नोंदणी चुकीची झाल्याने आता ती सुधारीत करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कालांतराने दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसेल. परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली नसेल त्यांना दुसरी लस घेण्याचे आवाहन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत आजवर १ कोटी ५७ लाख ३३ हजार ८१८ लसीकरण पार पडले असून यामध्ये ६४ लाख ४२ हजार १२६ लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर ९२ लाख ९१ हजार ६९२ लोकांनी पहिली मात्रा घेतली आहे.
Join Our WhatsApp Community