धक्कादायक! घरी परतणाऱ्या परप्रांतीयांना दिले बोगस कोरोना निगेटिव्ह अहवाल! 

ज्यांच्याकडे कोरोनाचा अहवाल नाही, अशा प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स मालकांनी कोरोनाचे बोगस अहवाल छापून त्यावर प्रवाशांची नावे टाकून ते अहवाल प्रवाशांना दिले.

93

राज्यात लॉकडाऊन होण्याच्या भीतीने मुंबईतून परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी परतत आहेत मात्र त्यांना प्रवास करताना आणि त्यांच्या राज्यात प्रवेश मिळावा म्हणून चक्क त्यांना कोविड निगेटिव्ह अहवाल दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला आहे. अशाच एका टोळीचा मीरा रोड येथे पर्दाफाश करण्यात मीरा-भाईंदर पोलिसांना यश आला आहे. गुजरातच्या दिशेने खासगी ट्रॅव्हल्स बसने निघालेल्या या कामगारांकडून कोरोना चाचणीच्या नावाखाली अधिक भाडे उकळून त्यांना निगेटिव्ह असल्याचे बोगस अहवाल देणाऱ्या ट्रॅव्हल्स मालक आणि चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

ट्रॅव्हल्स मालकांनी केली ‘सोय’!

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या वाटेवर असून कुठल्याही क्षणी लॉकडाऊन लावण्यात येईल, या भीतीने परराज्यातून मुंबई, ठाणे व इतर महत्वाच्या शहरात आलेल्या कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यातून आलेले मोठ्या प्रमाणात हे कामगार राज्यातील प्रमुख शहरामध्ये वसलेले आहेत. गुजरात सरकारने गुजरातमध्ये येणाऱ्यांनी कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल घेऊन यावे अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही, असा आदेश काढल्यामुळे कामगारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी होत असल्यामुळे गुजरात राज्यात जाणाऱ्या कामगारांनी खासगी बसेसला प्राधान्य दिल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे चांगलेच फावले आहे. मात्र बसमध्ये केवळ कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांना प्राधान्य देत असल्यामुळे कामगारांचे चांगलेच हाल होत आहे. ज्यांच्याकडे कोरोनाचा अहवाल नाही अशा प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स मालकांनी व्यवस्था केली आहे. कोरोनाचे बोगस अहवाल छापून त्यांच्यावर प्रवाशांचे नाव टाकून हे अहवाल प्रवाशांना दिले जात आहे, मोबदल्यात या प्रवाशांकडून मोठी रक्कम वसूल केली जात असल्याची माहिती मीरा -भाईंदर, वसई -विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती.

(हेही वाचा : डार्कनेटः ड्रग माफियांचा ऑनलाइन अड्डा! अशी आहे ड्रग्सची ऑनलाइन बाजारपेठ)

गुजरातकडे जाणाऱ्या बसवर केली कारवाई!

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक १ प्रभारी पो.नि रविराज कुराडे यांनी सोमवारी रात्री मीरारोड येथील काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरातकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बसला थांबवून तपासणी केली असता ३२ प्रवाशांपैकी २० प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्हचे बोगस अहवाल मिळून आले. अधिक चौकशीत हे अहवाल ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांनी कुठलीही चाचणी न करता दिले असल्याची माहिती प्रवाशांनी पोलिसांना दिली. गुन्हे शाखने या प्रकरणी बस चालक आणि ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकासह तिघांना अटक केली आहे. या तिघांना काशिमीरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या खासगी बस चालक आणि मालक यांनी केवळ पैसे कमविण्याच्या हेतुने कोरोनाच्या निगेटिव्ह अहवालाची बोगस अहवालाची प्रिंटआउट काढून त्याचावर प्रवाशांचे नाव लिहून त्यांना देण्यात आले होते, अशी माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय हजारे यांनी दिली. तसेच या प्रकरणात कुठलीही टेस्टिंग लॅब अथवा रुग्णालयाचा संबंध नसल्याचे हजारे यांनी सांगितले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून प्रवाशांना सोडण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.