धक्कादायक! शुटींगच्या सेटवरच बाल कलाकारावर बलात्कार!

ही घटना टीव्ही मालिकेच्या सेटवर २०१९ मध्ये घडली. त्यावेळी पीडित बाल कलाकारासोबत तिचे आई-वडील दोघे शुटींगच्या ठिकाणी होते.

टेलिव्हिजन वरील नागीन-३ या मालिकेतील अभिनेता पर्ल पुरी याला बलात्काराच्या गुन्ह्यात वसईतील वालीव पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्यावर सेटवर काम करणाऱ्या ५ वर्षांच्या बाल कलाकार मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हा अत्याचार २०१९मध्ये झाला असून पीडित बाल कलाकार मुलीच्या आईला माहीत असून देखील तिने याबाबत तक्रार केली नसल्यामुळे आईवर देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे. वालीव पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या पर्ल पुरी याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पुरीला पोलिस कोठडी सुनावली आहे.

२०१९ मध्ये घडली होती घटना!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना टीव्ही मालिकेच्या सेटवर २०१९ मध्ये घडली. त्यावेळी पीडित बाल कलाकार सोबत तिचे आई-वडील दोघे उपस्थित होते. दरम्यान पीडितेला त्रास होऊ लागल्यामुळे तिने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. मात्र आईने दुर्लक्ष केले. त्रास अधिक वाढल्यानंतर पीडितेने आपल्या वडिलांच्या कानावर हा प्रकार घातला, वडिलांनी डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे सांगितले. वडिलांनी विश्वासात घेऊन पीडित मुलीकडे चौकशी केली असता तिने वडिलांना झालेला प्रकार सांगितला.

(हेही वाचा : पुण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 8 पोलिस निलंबित!)

आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी २०१९ मध्ये वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र वर्सोवा पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे वडिलांनी या घटनेचा माग घेतला असता अखेर घटना वसई येथे घडल्याचे सांगत वर्सोवा पोलिसांनी हा गुन्हा वालीव पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. वालीव पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून शुक्रवारी अंधेरी आंबोली येथे राहणारा टीव्ही कलाकार पर्ल पुरी याला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here