हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात औषधेच नाहीत, रुग्णांना आणावी लागतात बाहेरुन औषधे

152

मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रम मुंबईकर नागरिकांच्या पसंतीस उतरला असून मागील अवघ्या १२ दिवसांमध्ये १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी या दवाखान्यातील सुविधांचा लाभ घेतल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. परंतु हा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात या नव्याने सुरू केलेल्या दवाखान्यांमध्ये रुग्णांसाठी औषधेच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. एका बाजूला तज्ज्ञ डॉक्टर आणून बसवले असले तरी रुग्णांना औषधेच मिळत नसल्याने याठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना खासगी दवाखान्यांप्रमाणेच बाहेरुन औषधे खरेदी करावी लागत असल्याची माहिती मिळत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. या योजनेचा सातत्याने विस्तार होत आतापर्यंत १०७ ठिकाणी आपला दवाखाने कार्यरत झाले आहेत.

ही योजना सुरू झाल्यापासून काल ६ मार्च २०२३ पर्यंत आपला दवाखाना लाभार्थी संख्या ५ लाख १ हजार १८८ एवढी झाल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाने केला आहे. यापैकी दवाखान्यांमधून ४ लाख ८३ हजार २३४ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १७ हजार ९५४ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला असल्याचा दावा केला जात आहे.

परंतु अनेक दवाखान्यांमध्ये आजही रुग्णांना आवश्यक औषधेच उपलब्ध नसून उपचारानंतर रुग्णांना बाहेरुन औषधे आणण्यास भाग पाडले जाते, अशी माहिती समोर आली आहे. देवनार डम्पिंग ग्राऊड, शिवाजी नगर येथील समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांनी याबाबत बोलतांना देवनार डम्पिंग ग्राऊंड शेजारी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणीच एसएमएस ही जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करणारी कंपनी असून यामुळे या भागांमध्ये अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. त्यामुळे आजारी रुग्णांसाठी याठिकाणी हा दवाखाना काही दिवसांपूर्वी सुरू केला असला तरी प्रत्यक्षात याठिकाणी औषधेच उपलब्ध नाही. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यालाच औषधे दान स्वरुपात दिली जावी अशी विनंती केल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले. तसेच ही समस्या या एकाच दवाखान्यामध्ये नसून सर्वच एचबीटी दवाखान्यांमध्ये ही समस्या असल्याचेही अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितल्याचे सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

एवढेच नाही तर येथील आदर्श नगर येथील दवाखान्याचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण केले जावे यासाठी आपण प्रयत्न करत आहे. परंतु सध्या औषधे नसल्याचे कारण देत हा दवाखाना सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – कामाच्या ठिकाणी बालकांचे संगोपन केंद्र उभारले गेले पाहिजे; नियोजन विभागाच्या कार्यक्रमातच उपायुक्त भाग्यश्री कापसे यांनी व्यक्त केल्या भावना)

महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही याला दुजोरा देत काही प्रमाणात ही समस्या असल्याचे मान्य केले. या दवाखान्यांसाठी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत औषध खरेदीची प्रक्रिया निविदा स्तरावर आहे. परंतु मुख्यालयाच्या माध्यमातून तोपर्यंत जीएम पोर्टलवर खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून या साठीचे कार्यादेशही संबंधित कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही औषधे मिळतील. याशिवाय दवाखान्यांच्या स्तरावर औषधे नसल्यास त्यांच्या खरेदीचे अधिकारही दिले असून जेणेकरून दवाखान्यांमधून दोन ते पाच हजारांपर्यंतची तातडीने औषधे खरेदी करता येवू शकतात. परंतु येत्या काही दिवसांमध्ये ही औषधे मिळाल्यानंतर आणि मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत याची निविदा अंतिम होऊन खरेदी झाल्यानंतर ही औषधांची समस्या राहणार नाही. या औषधांमुळेच नवीन दवाखान्यांचे लोकार्पण तुर्तास लांबणीवर टाकले असून औषधांचा साठा प्राप्त झाल्यानंतर अजून काही दवाखान्यांचे लोकार्पण केले जाईल, असाही विश्वास गोमारे यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.