धक्कादायक! राज्यात नवीन कोरोना रुग्ण संख्या १० हजाराच्या दिशेने! 

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने उसळी मारली असून दररोजच्या रुग्ण संख्येने प्रशासनाची अक्षरशः झोप उडवली आहे. 

फेब्रुवारी महिन्यापासून नव्याने पसरत चाललेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्ण संख्या थोडी कमी होत असतानाच दुसऱ्या दिवशी उसळी मारत आहे. अशा रीतीने राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी नवीन कोरोना रुग्ण संख्या ९ हजार ८५५ इतकी होती. याचा अर्थ राज्यात दररोज नव्याने सापडणारी रुग्ण संख्या आता १० हजाराच्या दिशेने कूच करू लागली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त!

सध्या राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत चालल्या बद्दल चिंता व्यक्त केली. पुन्हा राज्यात लॉक डाऊन लावायचा का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा : BS IV इंजिनाची शेकडो वाहने विकणारी टोळी गजाआड! )

रिकव्हरी रेटही घटला! 

दरम्यान १ जानेवारी रोजी राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या अवघी १,५००च्या घरात होती. मात्र बुधवार, ३ मार्च रोजी हीच रुग्ण संख्या थेट 9 हजार 855 झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. यात दिवसभरात राज्यात 42 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तर 6 हजार 559 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 20 लाख 43 हजार 349 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.77 टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाणही तुलनेने कमी झालेले आहे.

कोणत्या भागात सर्वाधिक रुग्ण ?

संपूर्ण राज्याचा ३ मार्च रोजी सापडलेल्या नवीन कोरोना रुग्ण संख्येचा जिल्हानिहाय आढावा घेतला असता मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक 1 हजार 121 नवीन रुग्ण सापडले आहेत, नागपूर मनपा क्षेत्रात 924, त्यानंतर पुण्यात ८५७, नाशिक ५९३, अमरावती ४८३ तर पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात ४६१ नवीन रुग्ण सापडले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here