धक्कादायक! राजावाडी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने रुग्णाचे डोळे कुरतडले! 

महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयामध्ये श्रीनिवास यल्लप्पा हा तरुण किडनीच्या आजारामुळे उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यावर आयसीयू कक्षात उपचार सुरु होते.

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात आयसीयू कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णावर आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरु आहे. आणि आयसीयूमध्ये उंदराने रुग्णाचे डोळे कुरतडणे हा प्रकार गंभीर असून यामुळे महापालिकेची आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे कुरतडली गेली आहे, याचा प्रत्यय येत आहे. काही वर्षांपूर्वी कांदिवली शताब्दी रुग्णालयामध्ये अशाच प्रकारे रुग्णाचा उंदरांनी चावा घेतल्याचा प्रकार घडला होता, त्यानंतर अशाप्रकारे महापालिकेच्याच राजावाडी रुग्णालयात हा दुसरा प्रकार घडला आहे.

परिचारिकांकडून उडवाउडवीची उत्तरे! 

महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयामध्ये श्रीनिवास यल्लप्पा हा तरुण किडनीच्या आजारामुळे उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यावर आयसीयू कक्षात उपचार सुरु होते. परंतु सकाळी त्याच्या बहिणीला डोळ्यावर पट्टी लावलेली आढळून आली. त्यामुळे त्यांनी ही पट्टी उघडून पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शंका आली. त्या तरुणाचे डोळे उंदराने कुरतडलेले त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी तेथील परिचारिकांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. हा रुग्ण कुर्ला येथे राहणारा आहे.

(हेही वाचा : बोगस लसीकरण जनतेच्या जीवाशी खेळ! मुंबई उच्च न्यायालयाकडून कारवाईचे आदेश  )

रुग्णाची प्रकृती गंभीर!

याबाबत राजावाडी रुग्णाच्या अधिक्षिका विद्या ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाच्या डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे वाटत आहे. परंतु त्यांच्या डोळ्याला इजा झालेली नाही. डोळ्याच्या खालील भागात ही जखम आहे.  त्यामुळे त्यांच्या डोळ्याच्या ठिकाणी झालेल्या जखमेवर उपचार करण्यात येत आहे. मात्र, या विभागात उंदीर येवू नये याची काळजी घेतले जाते. परंतु तळ मजला असल्याने उंदीर आला असावा, रुग्णाची प्रकृती मात्र गंभीर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकशीचे आदेश!

या प्रकारानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार दिलीप लांडे, एन प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे आदी उपस्थित होते. या वेळी त्यांनी या प्रकारच्या चौकशीचे आदेश दिले आहे. उंदीर आतमध्ये कसा आला, यापेक्षा हा प्रकार घडणे बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे रुग्णाची नातेवाईक स्वत: काळजी घेत असताना असा प्रकार घडणे ही बाब गंभीर असल्याचेही त्यांनी म्हटले.

उंदराच्या वावरामुळे अनेक आजारांचा संसर्ग!

कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उंदराने रुग्णांचा चावा घेण्याचा प्रकार घडला होता, तेव्हा छताच्या भागासह अनेक भाग बंद करून शक्य तिथे जाळ्या लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. उंदराच्या वावरामुळे अनेक आजारांचा संसर्ग होवू शकतो. त्यातच आयसीयू हा कक्ष निजंर्तुक मानला जातो. तिथे उंदराचा वावर म्हणून अनेक आजारांचा संसर्ग या कक्षात होवू शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा : अखेर मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here