मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने पाठवलेल्या नोटीस वजा सूचनेवरून दादरमधील दुकानदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही नोटीस मागे घेण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. मात्र, ही नोटीस वजा सूचना विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्याच्या दृष्टीकोनातून परिसर स्वच्छ राखण्यासाठी बजावली होती. त्यामुळे महापालिकेच्या या आवाहनाचा विपर्यास दादरमधील दुकानदारांनी केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने दादरमधील दुकानदारांना आपल्या दुकानासमोर कचरा न करण्याचे आणि स्वच्छ राखण्यासंदर्भात नोटीस वजा सूचना बजावल्याने नाराज झालेल्या दुकानदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच लेखी स्वरुपात कैफियत मांडली होती. यामध्ये त्यांनी दुकानदार हा कर भरत असून दुकानांबाहेर कुणामुळे कचरा होतो हे माहित असूनही दुकानदारांना अशाप्रकारचे आदेश देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात याप्रकारचा आदेश हा केवळ परिसर स्वच्छ राखण्याच्या दृष्टीकोनातून दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जी उत्तर विभागाच्यावतीने बजावलेल्या आदेशामध्ये असे म्हटले आहे की, माझी वसुंधरा, स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ मुंबई प्रबोधन अंतर्गत जी / उत्तर विभागात दादर माहिम व धारावी प्रभागात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान २०२२ सहायक अभियंता (घकव्य) जी / उत्तर विभागाकडून राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जी/उत्तर विभागातील नागरिक, दुकानदार, को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग संस्था, शाळा, महाविद्यालय, बँका, इमारती, चाळी, इ. अनेकांना सूचना देण्यात येतात की, त्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, आजुबाजूच्या परिसरात रोषणाई करावी, झाडे गेरुनी रंगवून सुशोभित कारावीत अशाप्रकारे स्वच्छता अभियानात महानगर पालिकेबरोबर सहभाग घेऊन स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडावा. स्वच्छतेबाबतचे विद्युत रोषणाईचे फोटो मनपाचे अधिकारी घनकचरा व्यवस्थापन जी / उत्तर यांच्याकडे द्यावेत, जेणेकरून आपणास “प्रशिस्त पत्र” देण्यास सोयीस्कर होईल, असे म्हटले आहे.
(हेही वाचा – मुंबईतील बहुचर्चित ४०० किलोमीटर रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांपैकी ५२ किलो मीटर लांबीच्या कामांना रविवारपासून प्रारंभ)
त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून केलेल्या आवाहनाचा दादरमधील दुकानदारांनी केलेल्या विपर्यासाबाबत खुद महापालिकेचे अधिकारी नाराज असून फेरीवाल्यांवर कारवाई ही केलीच जात आहे. त्याच्यामुळे होणाऱ्या साफसफाईची काळजी महापालिका घेतच असून दुकानदारांनी आपल्या समोरील परिसर स्वच्छ राखत महापालिकेच्या या मोहिमेत योगदान नोंदवावे अशाप्रकारची माफक भावना प्रशासनाची असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community