राज्यातील उपहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढणार! राज्य सरकारचा निर्णय

वेळा वाढवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहेत. 

119

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर सोमवारी ही बैठक पार पडली. यावेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील, असे यावेळी सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिल्यांदाच कोरोना मृतांची संख्या आली शून्यावर)

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

कोविड व्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. आपण हळूहळू निर्बंध शिथिल करत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुद्धा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच उपाहारगृहे व दुकाने यांच्या देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहेत.

तिस-या लाटेचा धोका कायम

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करुन घेणे, तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या आहेत. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे या नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेली सांगितले.

(हेही वाचाः लसीचा एक डोस घेतला तरी करता येणार लोकल प्रवास? राजेश टोपेंनी दिली मोठी माहिती)

कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून, येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आतापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.