म्युकरमायकोसीस वरील उपचारासाठी डॉक्टरांची तारेवरची कसरत

औषधे कमी प्रमाणात मिळाल्याने रुग्णांवर उपचार कशाप्रकारे करायचा, असा प्रश्न डॉक्टरांना पडलेला आहे.

102

कोरोनानंतर सध्या उद्भवलेल्या म्युकरमायकोसीस आजाराच्या रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. परंतु यासाठी लागणारी इंजेक्शन व औषधे मुंबई महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसून, औषधांच्या तुटवड्या अभावी रुग्णांना सेवा देताना डॉक्टरांना तारेवरील कसरत करावी लागत आहे.

(हेही वाचाः म्युकरमायकोसीस म्हणजे काय? काय आहेत लक्षणे? कसे दूर ठेवाल? वाचा उत्तरे…)

औषधांची समस्या

मुंबई शहरात आजमितीस सुमारे २०० च्या आसपास म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील बहुतांशी रुग्ण हे मुंबई बाहेरील आहेत. पोस्ट कोविड किंवा कोविडचे उपचार सुरू असताना बुरशीजन्य आजार म्हणजे “म्युकरमायकोसीस” आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या आजारामध्ये कान, नाक, घसा आणि डोळ्यावर गंभीर परिणाम होतात. महापालिकेच्या शीव, केईएम, नायर आणि कुपर रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा आजार होऊ नये आणि झाल्यास उपचार पद्धती, उपकरणे तसेच औषधे याबाबत ट्रिटमेंट प्रोटोकॉल निश्चित केलेला असला, तरी प्रत्यक्षात या औषधांची समस्या रुग्णालयांमध्ये निर्माण झाली आहे.

(हेही वाचाः म्युकरमायकोसिस: उपचार नको डोळेच काढा! असे म्हणतील गोरगरीब!  )

डॉक्टरांची लागते कसोटी

म्युकरमायकोसीस या आजारावर उपचार करण्यासाठी ‘एम्फो टेरेसीन-बी’ इंजेक्शन व इतर औषधांची गरज असते. परंतु प्रत्यक्षात जेवढे रुग्ण आहेत, त्यापेक्षा कमी इंजेक्शन व औषधे प्राप्त होत आहेत. औषधांच्या तुटवड्यामुळे डॉक्टरांची मोठी कसोटी लागत आहे. या औषधांची खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत प्रक्रिया सुरू केलेली असली, तरी प्रत्यक्षात रुग्णालयांनाच याची खरेदी करावी लागत आहे. औषधे कमी प्रमाणात मिळाल्याने रुग्णांवर उपचार कशाप्रकारे करायचा, असा प्रश्न डॉक्टरांना पडलेला आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्येच ही समस्या आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही म्युकरमायकोसीससाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः राज्यात म्युकरमायकोसीस औषधांचा तुटवडा! अजित पवारांची कबुली )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.