राज्यात म्युकरमायकोसीस औषधांचा तुटवडा! अजित पवारांची कबुली 

सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यावर भर देण्यात येत असून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार होऊ नये, तसेच रुग्णालयांना औषध पुरवठा सुरळीत होण्यासाठी या औषधांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे जाणवतात का, याची माहिती दूरध्वनीवरून घेण्यात यावी, जेणेकरून वेळेत उपचार होतील. त्याचबरोबर सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात मिळत आहे, मात्र म्युकरमायकोसीससाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली. पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

ग्रामीण आरोग्य यंत्रणा मजबूत होणे आवश्यक!

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमधील धोका विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, लहान मुलांवरील उपचाराबाबत प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध करुन द्या. लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करा, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

(हेही वाचा : म्युकरमायकोसिस: उपचार नको डोळेच काढा! असे म्हणतील गोरगरीब!  )

लसीकरणावर भर!

कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यावर भर देण्यात येत असून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील.

रुग्ण दर नियंत्रणात

मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्ण दर कमी असल्याचे दिसून येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, मृत्युदर नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here