बोरीवलीत सलग पाचव्यांदा ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठकच्या गरब्याचा ठेका

150

बोरीवली येथील स्वर्गीय प्रमोद महाजन मैदानावर ‘शो ग्लिट्स इंव्हेंट्स ऍंड एंटरटेनमेंट’च्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव मध्ये ‘दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठक पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

दुर्दैवाने गेल्या २ वर्षांपासून कोविड-१९ च्या भयानक परिस्थितीमुळे देशभरात सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करता आले नाही. आता सार्वजनिक नवरात्रोत्सवाला प्रशासनाकडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला असून, पुन्हा एकदा फाल्गुनी पाठक गुजरातीबहुल ‘बोरीवलीमध्ये’ आपल्या अफलातून गाण्याच्या जादूने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. २०१६ पासून सलग ४ वर्षे फाल्गुनी पाठक यांनी बोरीवलीतील नवरात्रोत्सवात लोकगीते आणि बॉलिवूडची गाणी तिच्या विशिष्ट शैलीत गाऊन संगीतप्रेमींना एक वेगळाच आनंद दिला आहे.

लोकांना थिरकताना पाहण्यासाठी मी उत्सुक

शो ग्लिट्स इंव्हेंट्स ऍंड एंटरटेनमेंटच्या वतीने बोरीवलीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फाल्गुनी पाठक यांनी सांगितले की, “कोविडच्या वाईट परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर लोक आता पुन्हा दैनंदिन आयुष्य जगायला लागले आहेत. अशा परिस्थितीत मी जगदंबा मातेकडे सर्वांना सुख, समृद्धी आणि सुरक्षितता प्रदान करण्याची प्रार्थना करते.” पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना त्या म्हणाल्या की, “नवरात्रीच्या मंचावरुन लोकांना थिरकताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

नवरात्रोत्सव मंडळांवरील गुन्हे मागे घ्यावेत

पत्रकार परिषदेला उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी देखील उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “उत्तर मुंबई आणि विशेषतः बोरीवलीतील लोक प्रत्येक सण धार्मिक सलोख्याने आणि आनंदाने साजरा करतात. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सव सलग पाचव्यांदा आपल्या लाडक्या बोरीवलीत होणार आहे. विद्यमान सरकारने सणांवरची टांगती तलवार हटवली आहे. हिंदू संस्कृतीचा अमोल नृत्योत्सव पूर्ण भक्तिभावाने साजरा करण्याची हीच वेळ आहे.”

याप्रसंगी या वर्षी नवरात्रोत्सवादरम्यान ४ दिवस मध्यरात्रीपर्यंत हा गरब्याचा कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती गोपाळ शेट्टी यांनी शासनाकडे केली आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे गोविंदा उत्सव आणि गणेश उत्सव मंडळांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले आहेत, त्याचप्रमाणे नवरात्री उत्सव मंडळांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी विनंती देखील त्यांनी केली.

कर्करोगग्रस्तांना करणार मदत

शो गिल्ट्स इव्हेंट्स ऍंड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे या नवरात्रोत्सवाचे आयोजक आहेत. या कंपनीचे संचालक संतोष सिंग पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “बोरीवलीतील नवरात्री उत्सव हे दानधर्म करण्याचे एक मुख्य माध्यम आहे. महत्वाचे म्हणजे या नवरात्रोत्सवाच्या आयोजनातून मिळणार्‍या रकमेतील काही भाग कर्करोगग्रस्तांना दिला जाणार आहे.”

यावेळी मंचावर खासदार गोपाळ शेट्टी, दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक, शो ग्लिट्स इव्हेंट अँड एंटरटेनमेंटचे संचालक संतोष सिंह, नवरात्रोत्सवाचे शीर्षक प्रायोजक रमेश जैन (जी. एम. स्विचेस), आयोजन समितीचे सदस्य विनय जैन (संचालक, विट्टी इंटरनॅशनल स्कुल), हर्षल लालाजी, जिग्नेश हिरानी, संजय जैन, ऋषभ वसा असे मान्यवर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.