कल्याणमधील सुभेदार वाड्यातील असाही एक आदर्श गणेशोत्सव!

155

सार्वजनिक गणेशोत्सव म्हटले की, बहुतेक ठिकाणी उत्सवाच्या नावाखाली धांगडधिंगाणा, कर्णकर्कश आवाजात सिनेमाची गाणी, मोठमोठ्या मिरवणुका, डीजे हेच दिसते. काही तुरळक सार्वजनिक गणोशोत्सव मंडळे असतील, जे उत्सवाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी अथवा राष्ट्र उभारणीसाठी करत असतील. यामध्ये कल्याणमधील सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

लोकजागृती करणे, राष्ट्रभक्ती वाढवण्याचा प्रयत्न 

कल्याणमधील सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे १२८वे वर्ष आहे. या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव अविरतपणे सुरु आहे. उत्सव साजरा करताना त्याचा उद्देश मनोरंजनाचा असण्यापेक्षा तो लोकजागृतीचा, समाजप्रबोधनाचा, राष्ट्रभक्ती वाढवण्याचा असावा, असा आदर्श दृष्टिकोन ठेवणारी मंडळे क्विचतच दिसतील. सुभेदार वाडा सार्वजिनक गणेशोत्सव मंडळाने मात्र याच उद्देशाने गणेशोत्सव साजरा करण्याचे पथ्य पाळले आहे. म्हणून या ठिकाणी रेकॉर्ड डान्स, कव्वाली मुकाबला असे कार्यक्रम होत नाहीत. विशेष म्हणजे या उत्सवाची कोणत्याही एकाच मंडळाकडे मक्तेदारी नाही. दर दोन-दोन वर्षांसाठी वेगवेगळ्या मंडळांकडे या संपूर्ण उत्सवाची जबाबदारी सोपविण्यात येते.

(हेही वाचा अमित शहांच्या आधीच अजित डोभाल मुंबईत दाखल!)

उत्सवाचे आयोजन आटोपशीर 

यंदाच्या वर्षी या उत्सवाची जबाबदारी ही श्रीमंत पेशवा मित्र मंडळाकडे आहे. या मंडळाने उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय व्याख्याते आणि इतिहासकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. विषय होता ‘पराक्रमी थोरले बाजीराव’!  हा कार्यक्रम वेळेत सुरू झाला. कार्यक्रमाचे सर्व आयोजन आटोपशीर करण्यात आले. त्यामुळे डॉ. शेवडे यांनाही या मंडळाचे कौतुक करणे रहावले नाही. कार्यक्रमाच्या वेळी पावसाची रिमझिम चालू असूनही कार्यक्रमाला ५००-६०० श्रोतु वर्ग जमले होते. पराक्रमी राजांचा इतिहास ऐकण्यासाठी आजही तरुणांचे कान आसुसलेले असतात आणि त्यांची ही भूख अशा उत्सवांच्या माध्यमातून शमवल्यास भावी पिढी नक्कीच आदर्शवान होईल, यात तिळमात्र शंका नाही.

तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा 

या ठिकाणचा उत्सव यशस्वी होण्यासाठी जेवढे म्हणून तरुण झटत आहेत, ते अननुभवी आहे, परंतु प्रचंड उत्साही आणि हरहुन्नरी आहेत. त्यांच्यामध्ये कोणी विद्यार्थी आहेत तर कोणी व्यावसायिक, तर बरेचसे नोकरदार आहेत. जे गेले तीन महिने आपले काम सांभाळून उत्सव यशस्वी करण्याच्या उद्देशाने झपाटून गेले होते. राज्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव आणि इतर उत्सव साजरे होतात, त्या मंडळीनी नक्कीच कल्याणमधील सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाचा आदर्श घेऊन तरुण पिढीवर अशा प्रकारे उत्सवाचे उत्तरदायित्व सोपवायला हवे आणि ज्येष्ठांनी ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार…’ अशी दुय्यम भूमिका घ्यायला हवी, तरच उत्सवासाठी युवा पिढी सिद्ध होईल, असे डॉ. शेवडे यांनी यानिमित्ताने म्हटले आहे.

(हेही वाचा अजित डोभाल यांच्या मुंबई दौऱ्यामागील काय आहे कारण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.