अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या मंगल दिनाचा मुहूर्त साधून देशातील पहिला श्रीराम वाटिका ऑक्सिजन हब राष्ट्राला अर्पण करण्यात आला. मयूरबन कॉलनी, गादिया विहार रस्ता, शहानूर वाडी, छत्रपती संभाजी नगर येथील मयूरबन कॉलनीतील १४००० स्क्वेअर फूट मोकळी जागा पडिक होती. लोकं तिथे कचरा टाकायचे. या जागी हा ऑक्सिजन हब (ShriRam Vatika Oxygen Hub) उभारण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष, भारतीय योग संस्थांचे जिल्हा प्रधान तसेच विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांताचे विशेष संपर्क प्रमुख भाऊ सुरडकर आणि प्रयास युथ फाऊंडेशनचे मनोहर महाडिक यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी वृक्ष लागवड करून ऑक्सीजन हब तयार केले आहे. ६ डिसेंबर २०२१ला येथे स्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. कॉलनीतील अनेक रहिवाशांनी या उपक्रमात सहभाग घेऊन श्रमदान केले. आतापर्यंत या उद्यानात १२०१ झाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या ८५ प्रकारची झाडे असून त्यात वृक्ष, फळझाडे, फुलझाडे व औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या उद्यानाला ‘श्रीराम उद्यान’, असे नाव देण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्र मंडळाचे सुभाष कुमावत, विजय जहागीरदार, किरण सराफ, वैजनाथ डोमाळे मयूरबन कॉलनीतील सुधाकर चन्ने, डॉक्टर गणेश कल्याणकर, रजनी सुरडकर, स्वाती कल्याणकर, मुकुंद फुलगीरकर, कविता नंदनवार, चंद्रकांत नंदनवार, विजयकुमार बोर्डे, राजे बाबुराव नालामवार, मीना कुलकर्णी, यशवंत गलांडे, अलका गलांडे, विद्यासागर कुबेर, गणेश जाधव, सुनिता डोमाळे, विद्यासागर, मकरंद कुलकर्णी आदी मयूरबन कॉलनीचे रहिवासी उपस्थित होते.
देशातील एकमेव घटना
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी सांगितले की, २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी हे उद्यान राष्ट्राला अर्पण केले हे आपलं भाग्य असून ही देशातील एकमेव घटना आहे, असं सांगून पुढे त्या म्हणाल्या की, समर्पित भाव ठेवून सतत राबत असलेले भाऊ सुरडकर आणि मनोहर महाडिक यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहेत. ते स्वतः हातात फावडे घेऊन गवत काढत असतात. झाडांना पाणी देतात. त्यांचं काम अविरत चालू असते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हा प्रकल्प उत्तम आहे. या ठिकाणी आपण घरातील प्लास्टिकचा वापर करून जी सुंदर कलाकृती केलेली आहे. तीदेखील वाखण्याजोगी आहे. समाजानेदेखील छोटे छोटे उपक्रम करून राष्ट्रकार्यास सहभाग नोंदवावा, असे देखील त्यांनी सांगितले. भाषणाच्या समारोपावेळी बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या की, ” अशा उपक्रमांतूनच पर्यावरणाचे रक्षण होणार आहे यात शंका नाही.