गोरेगाव येथील सिध्दार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम महापालिकेने हाती घेतले असून या रुग्णालयाच्या बांधकामासाठी आता महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. तळ अधिक २० मजल्यांच्या या रुग्णालयीन बांधकामासाठी ३५२कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. या कंत्राट कामांसाठी महापालिकेने रस्ते घोटाळ्याप्रकरणी काळ्या यादीत टाकलेले आणि हे सर्व डाग पुसून पुन्हा महापालिकेत सक्रिय झालेल्या जे.कुमार या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे जे.कुमार या कंपनीने आजवर मुंबईतील रस्ते आणि मलनि:सारण वाहिन्यांचेच काम केलेले असून राजस्थानमध्ये बनवलेल्या रुग्णालयीन इमारतीच्या अनुभवाच्या आधारावर मुंबई महापालिकेच्या इमारत बांधकामांच्या कामातही आता जे. कुमार यांनी उडी मारलेली पहायला मिळत आहे.
३५२ कोटी रुपयांचे कंत्राट
गोरेगाव येथील सिध्दार्थ नगर येथील सिध्दार्थ महापालिका रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने पाडण्यात आली. या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात येत आहे. दोन तळघर अधिक तळ मजला ११ मजल्याची एक इमारत आणि तळ मजला अधिक एक मजल्याचे शवविच्छेदन केंद्र व स्टील्ट अधिक २० मजल्यांच्या दोन इमारती असे बांधकाम करण्यात येणार आहे. पुनर्विकासात हे रुग्णालय ३०६ खाटांचे असून यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये जे.कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला ३५२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
सिध्दार्थ रुग्णालयाची जागा ही म्हाडाची असूनम म्हाडाच्या मुंबई मंडळाची याला म्हाडाची मंजुरी अजूनही प्रलंबित आहे. तसेच वृक्ष प्राधिकरण तसेच पर्यावरण मंत्रालयाचेही ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असून अद्यापही याला या संबंधित प्राधिकरणांची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे यासर्व परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतरच यासाठी पात्र ठरलेल्या कंपनीला काम देण्याचे पत्र दिले जाणार असल्याचे आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मागील आठवड्यात या रुग्णालयाच्या बांधकामाच्या प्रस्तावाला महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. कोणत्याही परवानगी नसताना प्रशासकांकडून प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कंत्राटदारांची घाई सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबणार, कारण… )
जे.कुमार या कंपनीला यापूर्वी रस्ते घोटाळा कामांमध्ये काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांच्या कालावधी संपुष्टात आल्यानंतर काळ्या यादीचा डाग पुसून या कंपनीने पुन्हा महापालिकेत नव्याने प्रवेश केला आहे. या कंपनीला काळ्या यादीचा डाग पुसल्यानंतर प्रथम दहिसर, बोरीवली ते मालाड या परिसराचा मलजल नवीन लिंक रोडवरील मलवाहिनीतील मलप्रवाह हा प्राधान्य मलजल बोगद्यात सोडला जाणार आहे. या बोगदा कामासाठी महापालिकेच्यावतीने जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट व मिशिगन इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त कंपनीची निवड करण्यात आली असून या संयुक्त भागीदारीतील कंपनीला ६७० कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते.
त्यानंतर आता या कंपनीला सिध्दार्थ रुग्णालयाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीने यापूर्वी मार्च २०१८मध्ये राजस्थानमधील अलवर येथे ५०० खाटांचे नवीन ईएसआयसी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय उभारल्याचा अनुभव जोडला आहे. जे.कुमार ही कंपनी महापालिकेतील नोंदणीकृत असून यापूर्वी त्यांनी रस्ते व मलनि:सारण विभागाचीच सर्वाधिक काम केलेली आहे. तर काळ्या यादीत टाकल्यानंतरही मुंबई मेट्रो रेल्वेच्या बांधकामाच्या काही भागाचे काम जे. कुमार या कंपनीला देण्यात आले होते. परंतु आता जे कुमार ही कंपनी रस्ते आणि मलवाहिनीच्यांच्या कामांसोबत महापालिकेच्या रुग्णालयीन इमारत बांधकामांमध्ये प्रवेश करत असल्याचे पहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community