सिद्धार्थ महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय; मंजुरीनंतर पाच महिन्यांनी भूमिपूजनाचा मुहूर्त

100

मंबईतील गोरेगांव (पश्चिम) परिसरात असणा-या सिद्धार्थ नगरमध्ये महापालिकेच्यावतीने ३०६ खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी, १९ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. ५०,१३९ चौ.मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे रुग्णालय तळघर, तळमजला आणि त्यावरील ११ मजले यानुसार एकूण १३ मजल्यांचे असणार आहे. सप्टेंबर महिन्यात प्रशासकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली, परंतु प्रत्यक्षात याच्या भूमिपूजनाला जानेवारीचा मुहूत सापडला आहे. या रुग्णालयामुळे सिद्धार्थनगर, गोरेगाव पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, मालाड पश्चिम, मालवणी, आरे कॉलनी इत्यादी परिसरातील साधारणपणे ८ ते १० लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा उपलब्ध होणार आहेत.

जे कुमार कंपनीला झुकते माप

हे रुग्णालय तळघर, तळमजला आणि त्यावरील ११ मजले यानुसार एकूण १३ मजल्यांचे असणार आहे. तर या व्यतिरिक्त २० मजल्यांची निवासी इमारत देखील बांधण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयात रुग्णवाहिकेसह १०८ वाहने उभी राहतील एवढे भव्य वाहनतळ असणार आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी जे कुमार या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला रस्ते कामांमध्ये महापालिकेने काळ्या यादीत टाकले होते, परंतु काळ्या यादीत टाकल्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा त्यांनी महापालिकेतील विकासकामांमध्ये भाग घेतला आहे. या कंपनीने यापूर्वी मार्च २०१८मध्ये राजस्थानमधील अलवर येथे ५०० खाटांचे नवीन ईएसआयसी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय उभारल्याचा अनुभव जोडला आहे. जे.कुमार ही कंपनी महापालिकेतील नोंदणीकृत असून यापूर्वी त्यांनी रस्ते व मलनि:सारण विभागाचीच सर्वाधिक काम केलेली आहे. तर काळ्या यादीत टाकल्यानंतरही मुंबई मेट्रो रेल्वेच्या बांधकामाच्या काही भागाचे काम जे. कुमार या कंपनीला देण्यात आले होते. परंतु आता जे कुमार ही कंपनी रस्ते आणि मलवाहिनीच्या  कामांसोबत महापालिकेच्या रुग्णालयीन इमारत बांधकामांमध्ये प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा मुंबईत कुठे कुठे आहेत जोशीमठ?)

कोणत्या सुविधा मिळणार?

या रुग्णालयात प्रस्तावित करण्यात आलेल्या ३०६ रुग्णशय्यांपैकी २२० रुग्णशय्या ह्या वैद्यकीय विभाग, शल्यक्रिया, अस्थिव्यंग, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूति, कान-नाक-घसा, नेत्ररोग यासाठी असणार आहेत. ५५ अतिदक्षता रुग्णशय्या या वैद्यकीय, नवजात शिशू, अपघाती रुग्ण यांच्याकरिता असणार आहेत. तर उर्वरित ३१ अतिविशेषोपचार रुग्णशय्या ह्या युरोसर्जरी, केमोथेरपी, कार्डियोलॉजी, डायलिसिस यासाठी असणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त शल्यचिकित्सा गृहांमध्ये ११ रुग्णशय्या असणार आहेत. या रुग्णालयामध्ये इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेससह, क्ष-किरण (एक्सरे), सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, प्रगत प्रयोगशाळा, रक्तपेढी आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी केमोथेरपी वॉर्ड देखील असणार आहे. या रुग्णालयामुळे सिद्धार्थनगर, गोरेगांव पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, मालाड पश्चिम, मालवणी, आरे कॉलनी इत्यादी परिसरातील साधारणपणे ८ ते १० लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा उपलब्ध होणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.