नाशिक (Nashik) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे वर्ष २०२७ मध्ये ‘सिंहस्थ कुंभमेळा’ (Simhastha Kumbh Mela) होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका यांच्याकडून ६ सहस्र ९०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कुंभमेळ्यात ५ लाख साधू-महंत, तसेच ५ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. याअंतर्गत प्रत्येक पर्वणीला ८० लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. एकूण कुंभमेळ्याच्या नियोजनाची व्याप्ती लक्षात घेता आतापासूनच तयारीला आरंभ करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Krishna-Godavari basin land : कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील पाण्याखालील भूस्खलन संभाव्य भू-संकट; एनआयओच्या अभ्यासातून आले समोर)
नाशिक शहरातील पंचवटी (Panchavati) येथील साधूग्रामसाठी ५०० एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. तेथे ३००० प्लॉटचे नियोजन करण्यात आले आहे. यात ३ प्रमुख आखाडे आहेत, तर ५ लाख साधूंची रहाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कुंभनगरीच्या आराखड्यामध्ये ९ उड्डाणपूल, तीन जलकुंभ, एक मोठे रुग्णालय, ३५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते, ५ सहस्र दिशादर्शक कमानी, ६० किलोमीटर बॅरिकेडिंग, ए.टी.एम्., दूध व्यवस्था, बस वाहतूक व्यवस्था, ५ सहस्र सीसीटीव्ही कॅमेरे, २ सहस्र पथदीप, १५ सहस्र फिरती शौचालये यांचे नियोजन करण्यात आले आहे.
या काळात शहरात अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ५ सहस्र सीसीटीव्ही लावण्यात येतील. लाखो भाविकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पंचवटी परिसरातील सीतागुफा, काळाराम मंदिर, रामकुंड या परिसराला प्राचीन पंचवटीचे स्वरूप देण्यात येणार आहे. कुंभस्नान होणार्या रामकुंड आणि लक्ष्मीकुंड यांच्या मध्यभागी सतत जलप्रवाही भव्य गोमुख बनवण्यात येणार आहे
पायाभूत सुविधांचे निर्माण
पौराणिक सीता गुफा, काळाराम मंदिर, रामकुंड परिसर कॉरिडॉर बनवला जाईल. यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा चौपदरी मार्ग सहापदरी करण्यात येईल.
पोलीस दलाला बळकटी
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अतिरिक्त कुमकसह अनुमाने २५ सहस्र पोलिसांचा फौजफाटा लागण्याची शक्यता आहे. बाँब शोधक-नाशक पथकाला १० कोटी रुपये उपकरणे खरेदीसाठी आवश्यक आहेत. ड्रोन कॅमेर्यांसाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता शहरात निरीक्षणासाठी १०० ठिकाणी मनोरे उभारण्यात येतील. यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community