SIP Registration : भारतात सिपची चलती, ऑक्टोबर महिन्यात २५,००० कोटींच्या एसआयपी

ऑक्टोबर महिन्यात नवीन २४.१९ लाख एसआयपी खाती सुरू झाली.

51
SIP Registration : भारतात सिपची चलती, ऑक्टोबर महिन्यात २५,००० कोटींच्या एसआयपी
SIP Registration : भारतात सिपची चलती, ऑक्टोबर महिन्यात २५,००० कोटींच्या एसआयपी
  • ऋजुता लुकतुके

भारतात गुंतवणुकीचं एक साधन म्हणून म्युच्युअल फंडांचा पर्याय आता चांगलाच मूळ धरू लागला आहे. आणि त्याचंच प्रतीक म्हणून नुकत्या संपलेल्या ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इनव्हेस्टंमेंट प्लान म्हणजेच एसआयपीसाठी २४.१९ लाख नवीन खाती सुरू झाली आहेत. अख्ख्या महिन्याचा विचार केला तर २५००० कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक एकट्या एसआयपीच्या (SIP Registration) माध्यमातून म्युच्युअल फंडात (Mutual funds) आली आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया या संस्थेनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली असून ऑक्टोबरची आकडेवारी आतापर्यंतची सर्वोच्च असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय बाजारांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढत असल्याचं त्यामुळे समोर आलं आहे. तर तज्जांच्या मते या कालावधीत शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे शेअर बाजारातील पैसे लोकांनी म्युच्युअल फंडात लावले आहेत. कारण, ऑक्टोबर महिन्यात निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे ६ आणि ५ टक्क्यांनी खाली होते.

(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy 2025 : बोर्डर – गावसकर चषक की ॲशेस? कुठली मालिका विशेष रंगतदार?)

एसआयपी म्हणजे काय?

वर म्हटल्याप्रमाणे, एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान. शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीत धोका आणि जोखीम जास्त असते. त्यामुळे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं पसंत करतात. म्युच्युअल फंड़ कंपन्या अधिक अभ्यास करून आपले पैसे शेअर बाजारात गुंतवतात. आणि गुंतवणुकीच्या प्रमाणात त्याचा नफा आपल्याला वाटून देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दोन पद्धतीने करता येते. एक म्हणजे एकगठ्ठा किंवा एकरकमी केलेली गुंतवणूक, ज्यात ठरावीक रक्कम एकाच वेळी विशिष्ट म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. (SIP Registration)

दुसरी लोकप्रिय पद्धत आहे ती एसआयपीची. यात दर महिन्याला गुंतवणूकदार ठरावीक रक्कम गुंतवतात. आणि त्याचे युनिट्स तुमच्या खात्यात जमा होतात. एका म्युच्युअल फंडात किमान ५०० रुपयांपासून तुम्हाला गुंतवणूक सुरू करता येते. महिन्याच्या पूर्वनियोजित तारखेला तुमच्या खात्यातून एसआयपीची ठरलेली रक्कम वजा होते आणि म्युच्युअल फंडात जमा होते. शेअर बाजारात उतार चढाव होत असतात. त्यामुळे या प्रकारात परताव्याची हमी नसते. पण, एसआयपी द्वारे गुंतवणूक केली तर तुम्हाला नियमित गुंतवणुकीचा फायदा मिळतो. आणि दीर्घ कालावधीत तुम्हाला जास्त नफा मिळू शकतो. शिवाय गुंतवणूक आणि बचतीच्या सवयीसाठी ही पद्धत सुयोग्य मानली जाते. म्युच्युअल फंडाच्या कुठल्याही प्रकारात एसआयपीने गुंतवणूक करता येते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.