-
ऋजुता लुकतुके
जानेवारी २०२५ पासून भारतीय शेअर बाजारांमधील घसरण वाढली आहे आणि गुंतवणूकदारांचं करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. अशावेळी म्युच्युअल फंडात नियमितपणे एसआयपीच्या माध्यमातून पैसे गुंतवणाऱ्यांनीही ते काढून घ्यायला आणि एसआयपी थांबवायला सुरुवात केली आहे. नवीन एसआयपी सुरू करणाऱ्यांच्या तुलनेत एसआयपी बंद करणाऱ्यांचं प्रमाण बाजारात वाढत आहे आणि फेब्रुवारी महिन्यात तर एसआयपी बंद करणाऱ्यांचं प्रमाण विक्रमी १२२ टक्क्यांवर गेलं आहे. फेब्रुवारीत म्युच्युअल फंडांची ४५.५६ लाख खाती ही सक्रिय अवस्थेत आहेत. तर तब्बल ५४.७० लाख लोकांनी आपली एसआयपी गुंतवणूक बंद केली आहे. (SIP Stoppage)
जानेवारी महिन्यातही हे गुणोत्तर १०९ टक्के इतकं होतं. म्हणजेच एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या मोठी होती. ‘गुंतवणूकदार एसआयपीमधील गुंतवणुकीतून थोडा ब्रेक घेत आहेत. किंवा ते गुंतवणूक थांबवत आहेत. पण, जसजशी शेअर बाजाराची कामगिरी सुधारेल, तसा हा ट्रेंडही बदलेल अशी अपेक्षा युपीइन्व्हेस्टचे प्रवीण कुलकर्णी यांनी व्यक्त केली. (SIP Stoppage)
(हेही वाचा – होळी एकतेचा रंग दृढ करेल; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान)
त्याचबरोबर एसआयपीमधील गुंतवणूक ही दीर्घ काळासाठी असावी असा सल्लाही कुलकर्णी यांनी दिला आहे. ‘आम्ही गुंतवणूकदारांना एसआयपीचा उपयोग दीर्घ काळासाठी करण्याचा सल्ला देत असतो. १० वर्षं सातत्यपूर्ण गुंतणूक असेल तर बाजारातील सगळे उतार चढाव पचवून तुम्हाला चांगला परतावा मिळवून देण्याची क्षमता म्युच्युअल फंडात आहे. त्यामुळे एसआयपी सुरू करताना किमान १० ते १५ वर्षांच सातत्य ठेवा, असा सल्ला आम्ही गुंतवणूकदारांना देत असतो,’ असं कुलकर्णी म्हणाले. (SIP Stoppage)
मागच्या सहा महिन्यात भारतीय शेअर बाजारातील निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही महत्त्वाच्या निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे. निफ्टी ११ टक्क्यांनी तर सेन्सेक्स १० टक्क्यांनी खाली आला आहे. ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही ट्रेडिंग म्हणून न बघता, ती तुमची आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केलेली गुंतवणूक म्हणून पाहावी. १० वर्षांत १२ टक्क्यांहून जास्त परतावा मिळाला असेल तर ती गुंतवणूक चांगली म्हणायला हवी,’ असं प्रवीण कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. (SIP Stoppage)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community