म्हाडाच्या जुन्या शौचालयांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी साडेसहा कोटींचा खर्च

115

म्हाडाच्या अखत्यारित असलेली जुनी शौचालयांची पुनर्बांधणी तथा दुरुस्ती करण्यासाठी उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता ही जुनी शौचालये महापालिकेला हस्तांतरीत केली जाणार आहेत. त्यामुळे म्हाडाच्या या जुन्या शौचालयांची दुरुस्ती तथा पुनर्बांधणी करण्यापूर्वी या सर्व शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असून यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमधील म्हाडाच्या जुन्या शौचालयांच्या दुरुस्तीसह अनेक मोडकळीस आलेल्या शौचालयांच्या जागेवरील पुनर्बांधकाम हे प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्थानिक आमदारांच्या माध्यमातून म्हाडाच्या जुन्या शौचालयांची दुरुस्ती केली जात असली तरी अनेक म्हाडाच्या शौचालयांची दुरावस्थाच आहे. त्यामुळे उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून म्हाडाच्या जुन्या शौचालय दुरुस्तीसाठी महापालिकेला निधी मंजूर करून दिला आहे. त्यानुसार उपनगरातील म्हाडाच्या जुन्या शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेतले जात आहे. ज्यात मलकुंडासह काही ज्या भागांमध्ये मलवाहिनीची व्यवस्था आसपास आहे अशांचाही सर्वे केला जाणार असून जिथे मलकुंड आवश्यक नाही तिथे मलनि:सारण वाहिन्यांना जोडण्याचेही काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी जुन्या म्हाडा शौचालयांच्या मलकुंडासह बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असून त्यानुसार आवश्यक तिथे मलकुंड साफ करणे तसेच त्यांचे बांधकाम करणे आदींची कामे दुरुस्तीअंतर्गत हाती घेतले जाणार आहे. ज्याअंतर्गत दुरुस्ती तथा आवश्यकतेनुसार पुनर्बांधकाम केले जाणार आहे. या शौचालयांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी या शौचालयांचे संरचनात्मक लेखा परिक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक असल्याने म्हाडाच्या अखत्यारित असलेल्या पूर्व व पश्चिम उपनगरांमधील सर्व शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी साडे सहा कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी महापालिका मालमत्तांच्या संरचनात्मक लेखा परिक्षणासाठी असलेल्या सल्लागार शुल्काच्या निधी सांकेतांकमधून हा निधी स्थानांतर करत याची तरतूद करण्यात आली.

(हेही वाचा – पुन्हा मुंबईत पदपथांची खोदाखोदी : एल अँड टी खोदतेय, महापालिका बुजवतेय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.